ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या खुनाचा कट उघडकीस

June 1, 2009 3:23 PM0 commentsViews: 26

1 जून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या खूनाचा कट उघडकीस आला आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातला आरोपी पारसमल जैन याने अण्णा हजारे यांच्या खुनाच्या सुपारीची कबुली पनवेल कोर्टात दिली. पारसमल जैन हा कॉन्ट्रॅक्ट किलर असून सध्या पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणात सीबीआयच्या अटकेत आहे . कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानांना मदत देण्यासाठी लातूरचे उदयोगपती सतीश मंदाडे यांनी तेरणा ट्रस्ट उभारली होती. त्या ट्रस्टच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार अण्णा हजारेंनी उघडकीस आणला होता. सतीश मंदाडे हा या सुपारी मागचा मास्टर माइन्ड असून ही सुपारी कोणी दिली हे मात्र अजून उघड झाले नाही. मात्र या घटनेमागे पद्मसिंह पाटील यांचा हात असल्याचं बोललं जात आहे. राज्यातील नागरिकांनी एकत्र येऊन अशा गुडांशी लढा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे. तसंच आपण राज्यभर या विरूद्ध आंदोलन छेडणार असल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितलं. तसंच त्यांनी सरकारचं संरक्षण घेण्यास नकार दिला आहे.या घटनेचा शिवसेना आणि भाजपाने निषेध केला असून. दोषीवर कारवाई करण्याची मागणी अण्णांनी केली आहे.पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात सीबीआयने आणखी दोघांना अटक केली होती. काँग्रेसचे नेते आणि उद्योगपती पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचं गुढ आता स्पष्ट होतं आहे, असं चित्र यावरून दिसून येतंय. पण या अटकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणात एकूण सात जणाचा समावोश होता. पवनराजे निंबाळकर हे उस्मानाबाद जिल्ह्यातलं बडं प्रस्थ म्हणून प्रसिद्ध होतं. 3 जून 2006 रोजी नवी मुंबईत कळंबोली इथे त्यांची हत्या झाली. पवनराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे नातेवाईक. तर पद्मसिंह हे कृषिमंत्री शरद पवार यांचे कट्टर समर्थक होते. पवनराजे यांच्या हत्येत पद्मसिंहांचा हात असल्याची कुजबूज होती. पण आरोपी मिळत नव्हते. तीन वर्षानंतर खुनाला वाचा फुटली. 23 मे 2009 ला दिनेश तिवारीला मुंबई क्राईम ब्रॅन्चने अटक केली. दिनेश तिवारीला पोलिसांनी बोलतं केलं आणि पवनराजेंच्या खुनाची हकीकत बाहेर आली. दिनेश तिवारीच्या कबुलीतून पारसनाथ जैनला अटक झाली. पारसमलमुळे सतिश मंदाडे पोलिसांच्या हाती लागला आणि त्यानंतर पोलिसांनी डोंबिवलीतला भाजपचा नगरसेवक मोहन शुक्ल याला पवनराजे हत्याकांडप्रकरणी अटक केली. या अटकेतून हत्येचा कट उघड झाला. सतीश मंदाडे आणि त्याच्या इतर सहकार्‍यांना अनेक प्रकरणात पवनराजे निंबाळकरांची अडचण होती. त्यांचा काटा काढण्यासाठी सतीश मंदाडे यानं त्यांचा जुना मित्र निवृत्त एक्साईज इन्स्पेक्टर, आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील वॉर्ड नंबर 86 चे नगरसेवक मोहन शुक्ल याच्याशी संपर्क केला. मोहन शुक्ल याने डोंबिवलीतच राहणारा त्याचा जुना मित्र पारसमल जैन, याची भेट सतीश मंदाडे याच्याशी घालून दिली. जैन व्यापारी आणि कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. सौदा ठरला 30 लाख रूपयांना. पारसमल जैनने त्याचा मित्र दिनेश तिवारीशी संपर्क केला. दिनेश हा उत्तर प्रदेशमधला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या खासदाराचा ड्रायव्हर आहे. जागेच्या व्यवहाराचा बहाणा करून या दोघांनी पवनराजे निंबाळकरांना कळंबोळीत बोलावलं. तिथं पवनराजे आणि त्यांचा ड्रायव्हर समद काझी हे दोघे मारले गेले.

close