एव्हरेस्ट सर केल्यानंतर कृष्णा परतली घरी

June 2, 2009 1:12 PM0 commentsViews: 12

2 जून एव्हरेस्टवीर कृष्णा पाटील आज मंगळवारी मुंबईत परतली. मुंबई विमानतळावर तिचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम तिच्या नावावर झाला आहे. मराठमोळ्या कृष्णाने 21 मे 2009 रोजी एव्हरेस्टचं शिखर सर केलं. मुंबईत आल्यावर कृष्णाने मीडियाशी बोलताना सांगितलं 'मी जेव्हा एव्हरेस्ट सर केलं तेव्हा मी जगाच्या सर्वात उंच ठिकाणी असल्याची जाणीव होत होती. पण मला इथून खाली उतरायचं आहे याचं मनात भानही होतं',अशी प्रतिक्रिया कृष्णाने मुंबईत आल्यावर मीडियाशी बोलताना दिली. सारस्वत बँकेनं या विक्रमाची भेट म्हणून तिचं 30 लाखाचं कर्जही माफ केलं आहे. एव्हरेस्टवीर कृष्णा पाटीलचं मुंबई एअरपोर्टवर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यानंतर तिने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही भेट घेतली. यावेळी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेही उपस्थित होते. कृष्णाने ठाकरे यांना एव्हरेस्ट मोहिमेतले आपले थरारक अनुभव सांगितले. ठाकरे यांनी तिचं अभिनंदन केलं. एव्हरेस्ट सर करणारी कृष्णा पाटील ही महाराष्ट्राची तिसरी गिर्यारोहक ठरली. यापूर्वी सुरेंद्र चव्हाण आणि अश्विनी सडेकर-पवार यांनीही हिमालयाची यशस्वी चढाई केली आहे.

close