पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष : मीरा कुमार यांची बिनविरोध निवड

June 3, 2009 8:51 AM0 commentsViews: 14

3 जून, दिल्ली काँग्रेसच्या मीरा कुमार यांची लोकसभा अध्यक्षपदासाठी निवड झाली आहे. देशाच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यासंदर्भातला ठराव आज सकाळी 11च्या सुमारास सभागृहात मांडला गेला आणि त्यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांनी त्यांना समर्थन दिलं. मीरा कुमार यानी परंपरेनुसार सभागृहाला उद्देशून भाषण केलं. अध्यक्षपद स्विकारल्यानंतर पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी मीरा कुमार यांचं अभिनंदन करताना ' आम्हा सगळ्यांना तुमचा अभिमान आहे ' असं म्हटलं. बिहारमधल्या सासाराम मतदारसंघातून निवडून आलेल्या मीरा कुमार दलित समाजाचं प्रतिनिधीत्त्व करतायत. दिवंगत उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांच्या या कन्येनं या वेळच्या मंत्रिमंडळात जलस्त्रोत मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली. मंत्रीपदाची शपथ घेताना त्यांना वाटलंही नसेल की त्यांना एक ऐतिहासिक जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. आणि ती म्हणजे लोकसभा अध्यक्षपदाची. संसदेच्या इतिहासात महिला अध्यक्ष होण्याची ही पहिलीच वेळ. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींनीच मीरा कुमार यांना अध्यक्षपद मिळण्यासाठी पुढाकार घेतला. 1985मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आलेल्या मीरा कुमार यांनी 2004मध्ये सामाजिक न्याय आणि महिला सबलीकरण मंत्रालयाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. एम.ए. , एल.एल.बी. झालेल्या मीरा कुमार 1973मध्ये इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये दाखल झाल्या. त्यांनी स्पेन, इंग्लड, मद्रीदमधल्या भारतीय दूतावासात काम केलंय. त्यानंतर काँग्रेसमध्ये दाखल होऊन त्यांनी परराष्ट्र सल्लागार समितीचं सदस्यत्व, तसंच सरचिटणीसपदही भूषवलं. अन्न आणि ग्राहक समितीच्याही त्या सदस्य होत्या. रायफल शूटींगमध्ये पारंगत असणार्‍या मीरा कुमार यांची 'स्पोर्टस् वुमन' म्हणूनही ओळख आहे. सामाजिक कामात त्यांनी नेहमीच सक्रीय सहभाग घेतलाय. त्यांचं काम पाहून काँग्रेसनं त्यांना 1967मधल्या दुष्काळाच्या वेळी 'दुष्काळ मदत फंड समिती'च्या अध्यक्षपदी नेमलं होतं. गेली 20 वर्षे त्या अत्याचारग्रस्त दलितांना न्या मिळवून देण्यासाठी झटतायत. सामाजिक बांधिलकी जपणार्‍या या समाजसेविकाला आता खर्‍या अर्थानं जनतेच्या प्रश्नांना न्याय देता येणार आहे.

close