शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साबीर शेख यांचं निधन

October 15, 2014 6:48 PM0 commentsViews:

sabir shekh15 ऑक्टोबर : एकेकाळचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मर्जीत असणारे शिवसेनेचे निष्ठावंत नेते आणि माजी कामगार मंत्री साबीर शेख यांचं कल्याण जवळील कोनगावाजवळ दिर्घआजाराने निधन झालं. अनेक दिवसांपासून साबीर शेख आजारी होते. साबीर शेख यांना मणक्याचा आजार आणि डायबिटीसनं ग्रासलं होतं. . उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लढवय्या तुकडीतील बिनीचा शिलेदार..शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे लढणारा आणि भिडणारा कडवट शिवसैनिक..जिल्हाप्रमुख ते राज्याचे कामगारमंत्री असा अद्वितीय प्रवास केलेला मुसाफीर.पट्टीचा वक्ता, प्रवचनकार, किर्तनकार या सार्‍या क्षेत्रातही प्रभुत्व मिळालेला सरस्वतीपुत्र…एकेकाळचं भगवं झंझावाती वादळं…मुस्लीम असुनही शिवसेनाप्रमुखांच्या आखोंका नुर म्हणजे साबीर शेख होते. मात्र सत्ता असली की सगळे सलाम करतात, लाल दिव्याला पहिलं मानाचं पानं मिळतं. पण सत्ता गेली.. वय झालं की कोणीही फिरकत नाही. अशी वेळ साबीर शेख यांच्यावर आली होती. साबीर शेख कित्येक दिवस आजारी आणि विपन्नावस्थेत होते. वन रुम किचनंच्या अत्यंत साध्या घरात विपन्नावस्थेत जगणार्‍या साबीर शेख यांना मणक्याचा आजार आणि डायबिटीसनं जर्जर ग्रासलं होतं. पत्नीच्या निधनानंतर साबीर भाई एकटे पडले होते. समाजासाठी वाहुन घेणार्‍या साबीरभाईंनी स्वता:साठी काही कमावलं नाही. त्यामुळे उपचारांचा खर्चही त्यांना झेपणं कठीणं झालं होतं.भाईंना आधाराशिवाय उठणं अशक्य होतं. बेडजवळ असलेल्या इमर्जन्सी बेल दाबल्यावर मदतीला शेजारपाजारचे शिवसैनिक धावून यायचे एवढीच ती मदत होती. अखेर आज या लढवय्या शिवसैनिकाने कल्याण जवळील कोनगावाजवळ अखेरचा श्वास घेतला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close