भाजपला स्पष्ट बहुमत, सर्व्हेचा अंदाज

October 15, 2014 9:34 PM0 commentsViews:

ibn lokmat_ today chanakya_poll15 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान झालं आणि आता उत्सुकता आहे ती निकालाची. पण सत्ता कुणाची येणार ? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. यासाठीच टुडेज आणि चाणक्य या संस्थेनं सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार राज्यात मोदी लाट कायम दिसली आहे. या सर्व्हेत भाजपने बाजी मारली आहे. भाजप आणि घटक पक्षांना 151 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. बहुमतासाठी 145 जागांची गरज आहे. पण या सर्व्हेत भाजपने 151 जागा पार केल्या आहे. तर यंदा भगवी दिवाळी साजरी करणार असा विश्वास व्यक्त करणार्‍या शिवसेनेच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलंय. शिवसेनेला 71 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर काँग्रेसला 27 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 28 जागा मिळतील. तर पाचव्या स्थानावर असलेल्या मनसेसह इतर पक्षांना 11 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

राज्यातलं सरकार बदलायला हवं का ?

यंदाची विधानसभा निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे. गेल्या 25 वर्षांचा भाजप आणि शिवसेनेचा संसार मोडला आणि त्यापाठोपाठ काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडीही संपुष्टात आली. त्यामुळे सर्वच पक्ष स्वबळावर मैदानात उतरल्यामुळे राज्यात पंचरंगी लढती पाहण्यास मिळत आहे. आज 228 जागांसाठी राज्यात शांततेत मतदान पार पडलं. त्यामुळे निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मतदानापूर्वी अनेक सर्व्हे अन्य वाहिन्यांवरून प्रसिद्ध झाले. या सर्व्हेत भाजपच्या बाजूने कौल देण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार कुणाचे येणार ? यासाठी टुडेज आणि चाणक्य या संस्थेनं विश्वासार्ह सर्व्हे केलाय. या सर्व्हेत राज्यातलं सरकार बदलायला हवं, असं तुम्हाला वाटतं का ? असा सवाल केला असता 65 टक्के लोकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होकार दिलाय. तर 28 टक्के लोकांनी नकार दिलाय. तर 7 टक्के लोकांनी माहित नाही असं सांगितलंय

मोदींची जादू कायम ?

नरेंद्र मोदी म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे नरेंद्र मोदी हे समीकरण लोकसभेत जुळून आलं. त्यामुळे ‘अब की बार मोदी सरकार’ हे सत्यात उतरलं. जनतेनंही मोदी लाटेवर स्वार होतं सत्तेच्या चाव्यात भाजपच्या हाती सोपवल्या. मात्र गेल्या 100 दिवसांत मोदी सरकारने घेतलेले निर्णय आणि पोटनिवडणुकीत भाजपची झालेली पिछेहाट त्यामुळे महाराष्ट्रात मोदी लाट कायम राहिल का असा प्रश्न उपस्थित झाला होता. खुद्द भाजपने ‘चलो चले मोदी के साथ’ असा नाराच दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही प्रचाराच्या रणसंग्रामात उतरले होते. त्यामुळे मोदींची जादू अजूनही आहे, असं तुम्हाला वाटतं का? त्यामुळं बदल होण्याची शक्यता आहे का ? असा सवाल विचारला असता 63 लोकांनी मोदींची जादू कायम असल्याचं सांगितलंय. तर 29 टक्के लोकांनी नाही म्हटलंय.तर 8 टक्के लोकांनी माहीत नाही असं उत्तर दिलंय.

2009 ची निवडणूक आणि आज

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने सलग 15 वर्ष सत्ता उपभोगली. 2009 च्या निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला 82 जागा तर राष्ट्रवादीला 62 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला 46 आणि शिवसेनेला 44 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर मनसे आणि इतर पक्षांनी 54 जागांची लयलूट केली होती. आता मात्र जनतेनं सत्तापरिवर्तनाचे संकेत दिले आहे. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपला 151 हून अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केलाय. तर शिवसेनेला 71 जागा मिळतील. तर काँग्रेसला 27 आणि राष्ट्रवादीला 28 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. मनसे आणि इतर पक्षांना 11 जागा मिळतील असा अंदाज आहे.

सरकार कुणाचं ?

1. राज्यातलं सरकार बदलायला हवं, असं तुम्हाला वाटतं का ?

हो – 65 %
नाही – 28 %
माहीत नाही : 7%

2. मोदींची जादू अजूनही आहे, असं तुम्हाला वाटतं का? त्यामुळं बदल होण्याची शक्यता आहे का ?

हो – 63 %
नाही – 29 %
माहीत नाही : 8%

3. मतदानासाठी कोणते मुद्दे तुमच्यावर प्रभाव टाकतात ?

राजकीय पक्ष आणि उमेदवार – 39 %
भ्रष्टाचार – 23 %
सरकारी योजना – 22 %
इतर मुद्दे – 9 %

 

पक्ष 2009 2014 (अंदाजे)
भाजप+ 46 151(उणे/अधिक 9)
शिवसेना 44 71(उणे/अधिक 9)
काँग्रेस 82 27 (उणे/अधिक 5)
राष्ट्रवादी काँग्रेस 62 28 (उणे/अधिक 5)
मनसे आणि इतर 54 11 (उणे/अधिक 5)

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close