निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये यादवी, ‘बाबा’आरोपीच्या पिंजर्‍यात !

October 17, 2014 4:47 PM0 commentsViews:

prithviraj chavan17 ऑक्टोबर : विधानसभा निकालाला अजून 2 दिवस बाकी आहे मात्र काँग्रेसमध्ये यादवी माजल्याचं बोललं जातंय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आदर्श प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशील कुमार शिंदे यांच्याबद्दल वक्तव्य केल्यामुळे अडचणीत सापडले आहे. त्यांच्या विधानामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी चव्हाणांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. त्यामुळे निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे वाहू लागले आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची गच्छंती ही अटळ असल्याचं बोललं जातंय.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला गेलाय आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडालीये. काँग्रेसमध्ये राजकीय यादवी माजल्याचं बोललं जातंय. इतकंच नाही तर निकालानंतर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची गच्छंती अटळ असल्याचं बोललं जातंय. अपयशाचं खापर कोणावर फोडायचं यावरून आता काँग्रेसमध्येच ब्लेम गेम सुरू झालाय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधातला असंतोष उफाळून येतोय. आणि निकालानंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत आहे. पण याला कारण ठरलं ते चव्हाणांची दैनिक ‘टेलिग्राफ’ मधली मुलाखत. टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीनंतर चव्हाणअनौपचारिक चर्चा करत होते. त्यावेळी त्यांनी आदर्श घोटाळ्या प्रकरणी अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यावर खापर फोडलं. आणि हा सगळा संवाद रेकॉर्ड झाला. आदर्श घोटाळयामध्ये अडकलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर कारवाई केली असती तर काँग्रेस पक्षात फूट पडली असती असं चव्हाणांनी म्हटलं होतं. त्यामुळेच पक्षातले ज्येष्ठ नेतेही नाराज झालेत. आपण जे बोललो ते अनौपचारिक गप्पांमध्ये बोललो होते, असं बोलायला नको होत असं स्पष्ट करत चव्हाणांनी दिलगिरीही व्यक्त केली. दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील सावनेरचे उमेदवार सुनील केदार यांनी पराभव झाल्यास चव्हाणच जबाबदार असतील असा हल्लाबोल केलाय. पराभवाची जबाबादारी पृथ्वीराज चव्हाणाच जबाबदार आहे,पृथ्वीराजांनी उमेदवारांची फसगत केली. त्यांनी पक्षश्रेष्ठींना चुकीची माहिती पोहोचवली असा आरोपच केदार यांनी केली. त्यांच्याबरोबर माणिकराव ठाकरे, मोहनप्रकाशही पराभव झाल्यास जबाबदार आहेत असंही केदार म्हणाले.काँग्रेसच्या प्रचारात अनेक चुका झाला. भाजपच्या मुद्यांवर उत्तर तयार नव्हती. चव्हाण फक्त कराडमध्येच प्रचार करत होते. इतर नेतेही आपल्याच मतदारसंघात अडकून पडले होते. कराडच्या निवडणुकीसाठी पैसा कुठून आला? असा सवालही केदार यांनी पृथ्वीराज चव्हाणांना केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close