फोर्स वनच्या पहिल्या तुकडीच्या ट्रेनिंगना सुरुवात

June 4, 2009 2:17 PM0 commentsViews: 4

4 जून 26/11 मुंबई हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या एनएसजी कमांडोंच्या धर्तीवर राज्यातही फोर्स वन नावाचं स्वतंत्र पोलीसदल उभं राहत आहे. या दलासाठी आवश्यक असणार्‍या चार चाचण्या घेतल्यानंतर 320 जवानांची निवड करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील 40 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर दुसर्‍या टप्प्यासाठी 220 जवान सज्ज झाले आहेत. या दलाच्या पहिल्या तुकडीच्या ट्रेनिंगचा शुभारंभ गृहमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाला. हे दल जागतिक पातळीवर सर्वोत्तम असेल असा विश्‍वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी नॅशनल सेक्युरिटी गार्डनं महत्त्वपूर्ण कामगिरी करत दहशतवाद्यांचा बिमोड केला. या बिकट परिस्थीतीला सामोरं जाण्यासाठी राज्याच्या पोलीस दलात अशाच प्रशिक्षित कमांडोची गरज निर्माण झाली होती. त्यानंतर फोर्स वन या अत्याधुनिक प्रशिक्षित आणि सुसज्ज स्वतंत्र पोलीस दलाची स्थापना करण्याचं निश्चित झालं. राज्यातील सर्व पोलीस रेंज मधून जवळपास 1600 जवानांनी यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. या दलासाठी आवश्यक असणार्‍या चार चाचण्या घेतल्यानंतर 320 जवानांची निवड करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील 40 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर दुसर्‍या टप्प्यासाठी 220 जवान सज्ज झालेत. त्यांच्या प्रशिक्षणाना औपचारीक शुभारंभ गृहमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाला. हे पोलीस दल जगाच्या पाठीवर नावलौकीक मिळविल असा आत्मविश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. जगाच्या पाठीवर सर्वोत्तम असं हे दल व्हावं असं मला वाटतं, असंही गृहमंत्री जयंत पाटील म्हणाले आहेत. त्यासाठी निवडण्यात आलेल्या या जवानांना पुढील चार महिन्यांसाठी एनएसजीच्या ट्रेनर्सकडून प्रशिक्षण मिळणार आहे. त्यानंतर या जवानांची मुंबई आणि पुणे नागपूर इथे नियुक्ती करण्यात येणार आहे. यावेळी जयंत पाटील यांनी जवानांशी संवाद साधला. जवानांनी काही प्रात्यक्षिकंही यावेळी करून दाखविली. या दलासाठी निधी आणि इतर व्यवस्थेची पुरेशी तयारी करण्यात आल्याचं पाटील यावेळी म्हणाले. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र पोलिस दलातीलच जवान आणि अधिकारी या दलात सहभागी झालेत. तर दुसर्‍या टप्प्यात एनएसजी, आर्मी तसंच इतर राज्यातील महाराष्ट्रीयन आणि मराठी अधिकार्‍यांना सहभागी करण्यात येणार आहे.

close