दक्षिण भारत दहशतवाद्यांच्या निशाणावर : हैदराबादमध्ये हाय अलर्ट

June 5, 2009 7:35 AM0 commentsViews: 4

5 जून दक्षिण भारत दहशतवाद्यांच्या निशाणावर असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर विभागाने दिली आहे. कारण केंद्रीय गुप्तचर विभागाने दक्षिण भारतात अतिरेकी हल्ले होण्याची शक्यता वर्तवली आहे. खासकरून आंध्रप्रदेशची राजधानी हैदराबाद दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचंही गुप्तचर विभागाने सांगितलं आहे. परिणामी हैदराबादमध्ये हाय अलर्ट जाहीर करून शहरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. तसंच दक्षिण भारतातील सर्वच राज्यातील सुरक्षाव्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलीये.2007 साली हैद्राबादमध्ये दोन अतिरेकी हल्ले झाले होते. मक्का मशिदीत मे महिन्यात झालेला स्फोट आणि ऑगस्ट महिन्यात शहरात झालेले दोन बॉम्बस्फोट लक्षात घेता पोलिस यावेळी विशेष खबरदारी घेताहेत. या हल्ल्यांमध्ये 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्याबद्दल पोलिसांना माहिती द्यावी अशी सुचनाही पोलिसांनी केलीये. शहरातील हॉटेल्स आणि लॉजमध्ये येणार्‍या सर्व ग्राहकांबरोबरच 20 ते 25 वयोगटातील युवकांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनाला दिलेत. शहरातील सर्व मॉल्स आणि इतर गर्दीच्या ठिकाणांवरील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आलीये. दक्षिणेकडे जाणार्‍या आणि येणार्‍या ट्रेन्समधील प्रवाशांचीही कसून चौकशी केली जात आहे. तीन हत्यारबंद अतिरेकी दक्षिण भारतात घुसले असल्याची माहिती जेव्हा आम्हाला केंद्रीय गुप्तचर विभागाने दिली तेव्हापासून हैदाराबाद पोलिसांनी त्यांचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली. हैदराबादमध्ये यापूर्वीही अतिरेकी हल्ले झालेत. त्यामुळे आम्ही विशेष काळजी घेत आहोत. तसंच शेजारील राज्यांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती हैदराबादचे पोलीस कमिशनर प्रसाद राव यांनी दिली आहे.

close