एमआयएमचा विधानसभेत शिरकाव, मनसेही पडली मागे !

October 19, 2014 8:55 PM1 commentViews:

mim_newsसिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद

17 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या निकालात मजलिस-ए इत्तहदुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमने अचानक मुसंडी मारल्याने सर्वांनाच धक्का बसलाय. मराठवाड्यात एक जागा एमआयएमला मिळाली असली तरी चार मतदार संघांमध्ये एमआयएमच्या उमेदवारांनी दुसर्‍या क्रमांकाची मतं मिळवली आहे हे विशेष..महाराष्ट्रात नवख्या असलेल्या एमआयएमने मनसेलाही मागे टाकलंय आणि आंध्रची सीमा ओलांडत महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश केलाय.

महाराष्ट्राच्या राजकारणात एमआयएम तसा नवखा पक्ष..नांदेडमध्ये 11 नगरसेवक असणार्‍या एमआयएमने महाराष्ट्राच्या राजकारणातही आता चमक दाखवून दिलीय. एमआयएममुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांमध्ये विभागणी होईल, अशी अटकळ बांधली जात होती. पण त्याने सेना-भाजपलाही चांगलीच टक्कर दिलीय. औरंगाबादेत माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, सेनेचे प्रदीप जैस्वाल आणि भाजपचे किशनचंद तनवानी या दिग्गज नेत्यांना एमआयएमचा फटका बसला. औरंगाबाद मध्यमधून एमआयएमच्या इम्तियाज जलिल यांनी विजय मिळवला.

मराठवाड्यात एयआयएमला एकच जागा मिळाली असली तरी त्यांनी उमेदवार पाडण्याची किमया साधलीय. औरंगाबादेत पूर्व आणि पश्चिम मध्ये दुसर्‍या क्रमांकाची मतं एमआयएमने मिळवलीत. औरंगाबादेत पूर्व मधून एमआयएमचे उमेदवार डॉ. कादरी केवळ चार हजार मतांनी पराभूत झालेत. नांदेड आणि परभणीतही एमआयएमच्या उमेदवारांनी दुसर्‍या क्रमांकाची मतं मिळवलीयत.

मराठवाड्यासोबतच एमआयएमने मुंबईतही खातं उघडण्यात यश मिळवलंय. एमआयएमचे उमेदवार वारीस पठाण यांनी भायखळ्याची जागा पटकावलीय.

आंध्रमधून आलेल्या एमआयएमकडे सुरुवातीला सर्वच पक्षांनी काणाडोळा केला. पण ओवैसी बंधूनी कट्टरपणा टाळत विकासाच्या मुद्यावर मुस्लिम मतदारांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं. सेना-भाजप वेगवेगळे लढल्यानं कट्टर हिंदू मतं विभागली गेली आणि एमआयएमला मराठवाड्यात फायदा झाला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • sadanand

    Hindu matanchi wibhaagni karnaaryaanno aataa tari shahaane whaa

close