केंद्रापाठोपाठ राज्यातही काँग्रेसची कोंडी

October 20, 2014 12:27 PM0 commentsViews:

BL02_STATES_RAHUL__1381731f20  ऑक्टोबर :  यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एका नवा इतिहास रचला आहे. कधी एकहाती, तर कधी आघाडीच्या रूपाने राज्यावर सत्ता करणार्‍या काँग्रेसला तिसर्‍या जागेवर टाकून भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून सत्तेवर आला. केंद्रात अजूनही विरोधी पक्षनेतेपद रिक्त असताना आता राज्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद कोणत्या पक्षाकडे जाईल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. यात काँग्रेसची मोठी कोंडी झाली आहे. आता सत्तास्थापनेदरम्यान कोणती राजकीय समीकरणं जुळून येतात यावर विरोधी पक्षनेतेपद ठरणार आहे.

भाजपला सर्वाधिक 122 जागा मिळाल्या आहेत. त्यापाठोपाठ शिवसेनेला 63 जागा, काँग्रेसला 42 जागा, राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत. आता सत्ता स्थापनेसाठी भाजपला कोण मदत करतं यावर इतर समीकरणं अवलंबून आहेत. भाजप आणि शिवसेना हे जुने मित्रपक्ष एकत्र आले तर तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करता येईल.

दुसरीकडे राष्ट्रवादीने कालच भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. आता भाजप आणि राष्ट्रवादी असे समीकरण तयार झाल्यास विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे जाईल. भाजप आणि शिवसेना सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले तरीही विरोधी पक्षनेतेपद तिसर्‍या क्रमांकावरील काँग्रेसकडे जाईलच असे नाही. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला एकच जागा कमी मिळाली आहे. निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने ‘बहुजन विकास पक्षा’सोबत आघाडी केली आहे. त्यांचे 3 आमदारही निवडून आले आहेत. त्यामुळे निवडणूकपूर्व आघाडीच्या आधारे राष्ट्रवादीकडे काँग्रेसपेक्षा जास्त संख्याबळ आहे आणि त्यामुळे भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा नाकारल्यास राष्ट्रवादी या मुद्दय़ावर विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे दोन्ही शक्यतांमध्ये विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणं दुरापास्तच! म्हणजेचं केंद्रापाठोपाठा राज्यातही काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही गमवावे लागण्याची शक्यता आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close