मनसेचं अस्तित्व धोक्यात?

October 21, 2014 1:03 PM0 commentsViews:

raj thackray

21 ऑक्टोबर :  विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रादेशिक पक्ष म्हणून असलेली मान्यता धोक्यात आली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत 13 आमदारांसह दणक्यात प्रादेशिक पक्षांची मान्यता मिळवणार्‍या मनसेचा या निवडणुकीत फक्त एकमेव आमदार निवडून आला आहे. त्यामुळे पक्षाची मान्यताच आता धोक्यात आली आहे. विधानसभेतल्या सुमार कामगिरीमुळे मनसेच्या प्रादेशिक मान्यतेबरोबरच पक्षाचं चिन्ह वाचवण्यासाठी राज ठाकरेंना झगडावं लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाल्यानंतर आता विधानसभेचंही चित्र काही वेगळं नाही. मनसेच्या बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर अशा दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर हक्काचा नाशिकचा बालेकिल्लाही खराब कामगिरीमुळे कोसळला. जुन्नरला शरद सोनावणेंच्या रूपानं एक आमदार निवडला. पण, तोही पक्षात टिकतो की नाही अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे मनसेचं अस्तित्व धोक्यात आलं आहे.

प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी दोन आमदार किंवा सहा टक्के मते किंवा विधानसभेच्या एकूण जागांपैकी 3 टक्के जागा निवडून आणणं किंवा किमान तीन आमदार निवडून आणणं असे तीन निकष गरजेचे असतात. मात्र मनसे यापैकी कुठल्याच निकषांमध्ये बसत नसल्याने मनसेची प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता निवडणूक आयोगाकडून रद्द होण्याची तसंच निवडणूक चिन्हही जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close