मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे ‘इंजिन’मधून उतरणार ?

October 21, 2014 6:15 PM0 commentsViews:

sharad_sonawane21 ऑक्टोबर : ‘एक हाती सत्ता द्या’ असं आवाहन करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जनतेनं स्पष्टपणे नकार देत इंजिनला चांगलंच रस्त्यावर आणलं. मनसेचे सर्वच दिग्गज नेते पराभूत झाले. पण पुण्यात जुन्नरमधून शरद सोनावणे यांनी मनसेची लाज राखली. शरद सोनावणे एकमेव आमदार निवडून आले आहेत. पण आता सोनावणेंही भाजपच्या गळाला लागतील अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. भाजपच्या नेत्यांनी संपर्क साधल्याची कबुली सोनावणे यांनी दिलीये.

मागील 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं सर्वाधिक 13 जागा जिंकून आपली जाणीव करून दिली होती. 13 आमदारांच्या बळावर मनसे पहिल्याच झटक्यात प्रादेशिक पक्ष होण्याचा बहुमान पटकावला होता. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभेतही मनसेचा पराभवाचा झटका लागला. मनसेचे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, प्रवीण दरेकर यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पण पुण्यात जुन्नर मतदार संघातून शरद सोनावणे यांनी विजयी होत मनसेची लाज राखली. विधानसभेत शरद सोनावणे यांच्या रुपाने मनसेचा एकमेव आमदार निवडून आला. पण भाजपने शरद सोनावणे यांना सोबत घेण्याची हालचाल सुरू केल्यामुळे मनसेत खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपुर्वी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधला होता. त्यांनी आपण भाजपमध्ये यावं अशी विनंती केलीये अशी स्पष्ट कबुली सोनावणे यांनी दिली. तसंच आज सोनावणे यांनी राज ठाकरे यांची मुंबईत कृष्णकुंजवर भेट घेतली. यावेळी राज यांनी पक्षातच राहावं आणि मनसेचं विधानसभेत नेतृत्व करावं असं सांगत पाठ थोपाटली असं सोनावणे यांनी सांगितलं. आपण भाजपमध्ये जायचं की नाही याचा निर्णय राज ठाकरे यांच्यावर सोपवण्यात आलाय तेच काय तो निर्णय घेतील असंही सोनावणे यांनी स्पष्ट केलं. जर सोनावणे भाजपसोबत गेले तर मनसेला निवडून आलेला एकमेव आमदार ही हाताच जाईल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close