शिवसेना नरमली, भाजपला देणार बिनशर्त पाठिंबा ?

October 21, 2014 9:40 PM0 commentsViews:

fadanvis_udhav_thackarey21 ऑक्टोबर : विधानसभेच्या निवडणुकीत भाजपवर कडाडून हल्ला करणारी शिवसेना आता नरमली आहे. शिवसेना भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

दिल्लीतल्या भाजप नेत्यांशी याबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना नेते अनिल देसाई आणि सुभाष देसाई दिल्लीला गेलेत. दिल्लीतल्या भाजप नेतृत्वाला पक्षाचा निरोप देणार आहेत.

तसंच बिनशर्त पाठिंबा देण्याबाबत प्राथमिक बोलणीही करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनीही सेनेशी चर्चा चालू असल्याची माहिती दिलीय.

दुसरीकडे मुख्यमंत्रिपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झालीय. गडकरींनी मुख्यमंत्री व्हावं, अशी मागणीही आता पुढे येतेय. नागपूरमध्ये गडकरींचं जंगी स्वागत करण्यात आलं.

भाजपला नागपूर आणि विदर्भात मिळालेल्या घवघवीत यशानंतर गडकरी पहिल्यांदाच नागपुरात आलेत. भाजपचे 40 आमदार गडकरींच्या घरी दाखल झाले. नितीन गडकरींनी मुख्यमंत्रिपदाचा स्वीकार करावा, अशी विनंती त्यांनी केलीय.

मी राज्यात परतणार नाही, असं गडकरींनी म्हटलं होतं. पण गडकरींनी राज्याचं नेतृत्व करावं अशी मागणी पुढे येतेय. एवढेच नाहीतर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही नितीन गडकरी मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केलीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close