अशी आहे दिवाळी अंकांची मेजवानी !

October 21, 2014 11:35 PM0 commentsViews:

केतकी जोशी, मुंबई

21 ऑक्टोबर : आता वर्षभर फराळातले सगळे पदार्थ मिळतात पण तरीही दिवाळीच्या फराळाचं अप्रूप आहेच…तसंच अप्रूप दिवाळी अंकाबद्दल आजही आहे. कारण दिवाळी अंकामध्ये एकाच वेळेस भरपूर विषयांवरचं खाद्य मिळतं.

नरेंद्र मोदींची डिजिटल इंडियाबद्दलची मुलाखत, सचिन तेंडूलकरचं भारतामध्ये सर्वांसाठी खेळाचं स्वप्नं,स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरूधंती भट्टाचार्य यांची मुलाखत आणि त्याचबरोबर शाहरूख खान, कपिल शर्मा आणि आलिया भट.. नाही, नाही…कोणत्याही चॅनेलवरच्या कार्यक्रमाची ही यादी नाहीये. तर ‘लोकमत’च्या दिवाळी अंकात हे सगळेजण आपल्याला भेटतात आणि तेही अगदी ग्लॅमरस रूपात..लोकमतचा ‘दीपोत्सव’ हा दिवाळी अंक खरंच डोळ्यांना सुद्धा मेजवानी देतो.दीपोत्सवचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो ग्लॅमरच्या पलीकडेही जातो. त्यामुळे आलिया आणि शाहरुखसोबत हा अंक आपल्याला नंदुरबार आणि आंध्र प्रदेशच्या नल्लमल्लाच्या जंगलातही हिंडवून आणतो आणि ‘बुरी नजर वाले तेरा मुँह काला’च्या पलीकडे जात ट्रक रंगवणार्‍या कलाकारांची अनोखी दुनियाही उलगडतो…

रसिक वाचक दुसर्‍या एका अंकाची आतुरतेनं वाट पाहतात तो अंक म्हणजे लोकसत्ता..लोकसत्ताच्या दिवाळी अंकाचं यावर्षीचं मुखपृष्ठ दरवर्षीप्रमाणेच देखणं आहे. यंदाच्या अंकाचं वैशिष्ट्य म्हणजे ‘विवेकाचा आवाज हरवलाय का?’ हा परिसंवाद . याशिवाय नुकत्याच झालेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरचा ‘राजकीय दहशतीचा उदयास्त’ हा विभागही वाचण्याजोगाच..कोकणातले राणे, सोलापूरचे मोहिते- पाटील, वसईचे हितेंद्र ठाकूर अशा वजनदार नेत्यांच्या कारकिर्दीचा आढावा यात घेतलाय. लोकसत्तामधल आणखी एक मस्ट रीड गोष्ट म्हणजे गुलजारांच्या मीनाकुमारी आणि नसरुद्दीन शहांसाठी केलेल्या खास कविता..

यंदाचा ‘अक्षर’ चा दिवाळी अंकही छान जमून आलाय. मिलिंद बोकील, राजकुमार तांगडे, गणेश मतकरींच्या कथा यात आहेत. सेल्फी नावाचा एक विशेष विभागही यात आहे, तरुणांच्या जनरेशनबद्दल तरुणांनीच मांडलेली मतं आहेत. त्यात शहरी तरुणांचं प्रतिनिधित्व करणारा आयबीएन लोकमतचा विनायक गायकवाड आहे तसाच ग्रामीण भागावर बोलणारे बालाजी सुतारही आहेत. याशिवाय प्रकाश अकोलकरांनी लिहिलेली तीन चित्रपटवेड्यांची कहाणीही इंटरेस्टिंग आहे. याशिवाय ग्राफिक नॉव्हेल या वेगळ्या विषयाबद्दल गजू तायडेंचं लिखाण ज्ञानात भर टाकतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close