बुलेटप्रूफ जॅकेटच्या दर्जाविषयी करकरेंच्या भावाने उठवला सवाल

June 6, 2009 6:08 AM0 commentsViews: 2

6 जून आशिष जाधव राम प्रधान समितीच्या अहवालावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं असतानाच, निकृष्ट दर्जाच्या बुलेटप्रूफ जॅकेटचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कारण बुलेटप्रूफ जॅकेटच्या दर्जाविषयी आता हेमंत करकरेंचे भाऊ शिरीष करकरे यांनीही शंका उपस्थित केली आहे. 26/11च्या दहशतवादी हल्लात मुंबई पोलीस दलाला काही कर्तबगार अधिकारी गमवावे लागले. त्यानंतर बुलेटप्रूफ जॅकेटच्या दर्जाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. अधिवेशनातही विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. निकृष्ट दर्जाच्या बुलेटप्रूफ जॅकेटमुळेच हल्ल्यादरम्यान, अनेक पोलीस अधिकार्‍यांना आपले प्राण गमवावे लागले, असा आरोप विरोधकांनी केला. विरोधी पक्षनेते रामदास कदमांनी तर सभागृहातच चांगल्या प्रतीचं जॅकेट दाखवून सरकारला जाब विचारला. सरकारने निकृष्ट दर्जाची जॅकेट विकत घेतली, असा आरोपही त्यांनी केला. हा आरोप करताना रामदास कदम ' जॅकेट खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला असून निकृष्ट दर्जाची जॅकेट्स त्या ठिकाणी आणली असावीत, अशी माझी शंका होती. म्हणून मी स्वत: खात्री करण्याच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराच्या हक्काचा वापर करत शासनाला एक पत्र लिहिलं. जॅकेट खरेदी कोणी केली, ती कुठून झाली, कंपनी कुठली हे सारं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जॅकेट खरेदीच्या रिसीट सापडत नाहीयेत असं उत्तर आम्हाला मिळालं, असंही म्हणाले. विरोधकांच्या या टीकेला उत्तर देताना, पुरावे दिले तर कारवाई करू, असं सांगत, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याप्रकरणावर पडदा पाडायचा प्रयत्न केला. ' 1992 ते 2002 या काळात 965 बुलेट प्रुफ जॅकेट्स खरेदी केली गेलीत. चांगल्या दर्जाची जॅकेट्स खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रमाईज केलं गेलं नसल्याचं अशोक चव्हाण विधानपरिषदेच्या अधिवेशानात म्हणाले. दरम्यान, चांगल्या दर्जाचं बुलेटप्रूफ जॅकेट असतं, तर आपल्या भावाचे प्राण वाचले असते, अशी खंत हेमंत करकरेंचे भाऊ शिरीष करकरे यांनी सीएनएन-आयबीएनशी बोलताना व्यक्त केली. पुढे कधी जर 26/11 सारखा प्रसंग आला तर आणि आपल्याकडे निष्कृष्ट दर्जाची जॅकेट्स असली तर त्याची जबाबदारी कोणी घेणार. तसंच आपल्याला एनएसजी, आर्मीच्या तोडीची जॅकेट्स का देत नाही. तुम्ही दर्जापेक्षा किमतीलाही का सर्वात जास्त महत्त्व देता , 'अशीही प्रतिक्रिया हेमंत करकरेंचे भाऊ शिरीष करकरे म्हणाले. एकंदरीतच विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी अधिवेशन लवकर गुंडाळण्याचा सरकारचा डाव असला, तरी, निकृष्ट दर्जाच्या बुलेटप्रूफ जॅकेटचं हे भूत एवढ्यात तरी सरकारच्या मानगुटीवरून उतरण्याची चिन्हं दिसत नाहीयेत.

close