एटीएसच्या प्रमुखपदासाठी चार अधिकार्‍यांची नावं चर्चेत

June 6, 2009 6:07 AM0 commentsViews: 3

6 जून सुधाकर कांबळे राज्याचं एटीएस प्रमुखपद गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त आहे. मात्र, आता या पदासाठी चार वरिष्ठ अधिकार्‍यांची नावं चर्चेत आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग, रेल्वेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक ए. पी. रघुवंशी, राज्य वीज महामंडळाचे दक्षता अधिकारी हेमंत नगराळे तसंच एटीएसचे अतिरिक्त पोलीस आयुक्त परमबीर सिंग या अधिकार्‍यांच्या नावाचा विचार सुरू आहे. दरम्यान एटीएसची पुनर्बांधणी विधीमंडळाचं अधिवेशन संपण्यापूर्वी केलं जाईल, असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधीमंडळात सांगितलं आहे. एटीएसचं प्रमुख पद, आयजी रँकचं आहे. या पदासाठी सर्वात आधी परमबीरसिंग यांचं नाव चर्चेत आहे. ते अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाचे आहेत. त्यांना तात्काळ बढती देऊन त्यांची एटीएसच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्याचा सरकारचा विचार आहे. तर, या पदासाठी चर्चेत असलेले ए. पी. रघुवंशी आणि सत्यपाल सिंग हे दोघंही अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे आहेत. या अधिकार्‍यांची नियुक्ती करायची झाल्यास, एटीएस प्रमुख पदाचा असलेला आयजी हा दर्जा वाढवावा लागेल आणि हे पद अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचं करावं लागेल. तसंच, राज्य वीज महामंडळाचे दक्षता अधिकारी हेमंत नगराळे यांचंही नाव यासाठी घेतलं जातंय. हेमंत करकरे हे जवळ जवळ वर्षभर एटीएसचे प्रमुख होते. त्याकाळात त्यांनी अनेक धाडसी कारवाया केल्या. 26/11च्या हल्ल्यातल्या घातपाती निधनानंतर एटीएसला अवकळा आलीय . आता, या पदावर कोणाची नियुक्ती होते, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तसंच, ही व्यक्ती एटीएसला गमवलेला विश्वास मिळवून देण्यात यशस्वी होते, याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.

close