80 हजार कोटींच्या करारांना संरक्षण मंत्रालयाची मंजुरी

October 26, 2014 1:04 PM0 commentsViews:

ins-sindhurakshak

26 ऑक्टोबर :  केंद्र सरकारनं काल (शनिवारी) संरक्षण साधनसामग्रीच्या खरेदीसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, त्यानुसार तब्बल 80 हजार कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. देशांतर्गत बांधण्यात येणार्‍या 6 पाणबुडयांसाठी 50 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘मेक इन इंडिया’ या योजनेखाली या पाणबुड्या बांधण्यात येणार आहेत. तसेच इस्रायलकडून 8,000 रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र खरेदी करायला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी 3,200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या क्षेपणास्त्रांसाठी 321 लाँचर्स खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. डॉर्नियर जातीच्या 12 टेहळणी विमानांचे अत्याधुनिकीकरण आदी प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून डॉर्नियर जातीची 12 सुधारित टेहळणी विमानं खरेदी केली जाणार आहेत. त्यासाठी 1,850 कोटींचा खर्च येणार आहे. तसंच पश्चिम बंगालमधल्या मेदक जिल्ह्यातल्या ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाकडून 362 लढाऊ वाहनं खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 662 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षण साहित्याच्या वाहतुकीसाठी खुले आणि बंद वॅगन्स खरेदी करण्यात येणार आहेत.

संरक्षण खात्याच्या खरेदीविषयक मंडळाची बैठक संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली काल (शनिवारी) झाली. या बैठकीत संरक्षण खात्याचे सचिव, तिन्ही सेनादलांचे प्रमुख, संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे प्रमुख आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत या प्रचंड रकमेच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या 80 हजार कोटी रुपयांमधील सगळ्यात मोठा हिस्सा नौदलासाठी खर्च होणार आहे. गेली अनेक वर्षे नौदलाकडून संरक्षण साहित्याची मागणी केली जात होती. गेल्या काही वर्षांमध्ये नौदलामध्ये अनेक दुर्घटना झाल्यात, त्यामुळे नौदलाच्या आधुनिकीकरणाला प्राधान्य दिलं गेलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close