अरे देवा, नवसासाठी चिमुरड्यांना उलटं लटकवलं जातंय !

October 27, 2014 6:24 PM0 commentsViews:

indapur_news27 ऑक्टोबर : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? असं म्हणण्याची वेळ आलीये. एकीकडे पुरोगामी महाराष्ट्राचा ठेंभा मिरवला जातोय पण दुसरीकडे अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याला केराची टोपली दाखवली जात आहे. इंदापूर तालुक्यातील रुई गावात नवसाच्या नावाखाली लहान मुलांना उलटं टांगून नवस फेडला जातो. रुई गावातल्या बाबीरबुवाच्या जत्रेत ही अघोरी प्रथा सुरू आहे. लहान मुलांच्या पायाला दोर बांधून त्यांना देवळाच्या भिंतीवरून 20 फुटांच्या उंचीवरून उलटं खाली सोडलं जातं.

एकविसाव्या शतकात भारताने आधुनिक तंत्रज्ञान वापरुन विविध क्षेत्रात प्रगती केलीय. मात्र ग्रामीण भागात त्याचा फारसा परिणाम झालेला नसल्याचं पहायला मिळतंय. इंदापूर तालुक्यातल्या रुई गावात भरवल्या जाणार्‍या यात्रेत चक्क लहान मुलांना उलटे टांगून नवस फेडण्याची अघोरी परंपरा सुरू आहे. अंधश्रद्धेला लगाम लावण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन कायदा अस्तित्त्वात आल्यानंतरही हे प्रकार सुरुच असल्याने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे बलिदान व्यर्थच ठरल्याचं पहायला मिळतंय.

बाबीर बुवा हा नवसाला पावणारा देव असा समज असल्यामुळे नवस फेडण्यासाठी दुसर्‍या दिवशीही हजारो भाविक येतात. मात्र हा नवस फेडण्याची अघोरी पद्धत पाहिली तर उपस्थितांच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. कारण या जत्रेत अगदी एक वर्षाच्या बाळापासून प्रौढांपर्यंत सर्वांनाच वेदना देणार्‍या कृतीला सामोरं जावं लागतंय. मंदिराशेजारी असलेल्या 15 ते 20 फूट उंचीच्या भिंतीवरून पायाला दोर बांधून खाली सोडले जातंय. या मुलांच्या पालकांमध्ये आपण बोललेला नवस फेडला आहे अशी भावना निर्माण होत असतानाच भिंतीवरून खाली वर घेताना होणार्‍या असह्य वेदना सहन करण्याशिवाय या चिमुरड्यांपुढे कोणताही पर्याय नसतो. या वेदना यावरच थांबणार नसून काहींना आणखी 5 वर्षे, 10 वर्षे तर काहींना आयुष्यभर भोगाव्या लागणार आहे. या देवस्थाच्या अगदी बाजूलाच पोलीस स्टेशन आहे. पण पोलिसांनीही या प्रकाराकडे दुर्लक्ष केलंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close