तानाजी पाटीलच्या नार्कोटेस्टमध्ये पद्मसिंह पाटील यांचं नाव उघड

June 9, 2009 7:43 AM0 commentsViews: 29

9 जूनतोरल वारिया पवनराजे निंबाळकर यांच्या खुनामागे पद्मसिंह पाटीलच असल्याची कबुली तानाजी पाटील याने दिल्यामुळे सीबीआय तपासाला वेग मिळाला आहे. तानाजी पाटीलने तशी कबुली नार्कोटेस्टमध्ये दिली होती. या नार्कोटेस्टची माहिती मुंबई हायकोर्टात सादरही झाली होती. पण त्यावेळेस गृहमंत्री असलेल्या आर.आर. पाटील यांनी तानाजी पाटील गाव गप्पा मारत आहेत, असं बोलून ही मागणी फेटाळली होती. पण आता पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यामुळे तानाजी पाटीलच्या नार्कोटेस्टला महत्त्व प्राप्त झालं आहे. तानाजी पाटील हा छोटा राजन टोळीशी संबधित असलेला गुंड आहे. तसंच तानाजीने नार्कोटेस्टमध्ये दिलेल्या कबुलीमुळे पद्मसिंह पाटील गोत्यात आले आहेत. 3 जून 2006 रोजी काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकरांची हत्या झाली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पद्मसिंह पाटील यांचा सहभाग असल्यावरून सध्या सीबीआयने त्यांना अटक केली आहे. याच प्रकरणातला एक संशयित तानाजी पाटील याची नार्कोटेस्ट झाली. नार्कोटेस्टमध्ये केलेल्या आरोपांकडे स्थानिक पोलिसांनी मात्र दुर्लक्ष केलं होतं. पवनराजे निंबाळकरांच्या हत्येच्या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांचं नाव गुंतलं असल्यामुळे सरकारी यंत्रणा हे प्रकरण गुंडाळण्याच्याच तयारीत होती. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी असतानादेखील, पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदवले नाहीत. महिन्याभरानंतर स्थानिक पोलिसांना याप्रकरणात कुठलाच सुगावा लागला नाही. त्यामुळे त्यांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केलं. गुन्हे शाखेने छोटा राजन टोळीशी संबंधित चार जणांना अटक केली. त्यात तानाजी पाटीलचाही समावेश होता. याप्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी वेळ लावला आणि पुन्हा एकदा तानाजीची नार्कोटेस्ट करावी असं म्हटलं होतं. पण जून 2006 साली उपमुख्यमंत्रीपदी असताना आर.आर. पाटील यांनी पाटील यांचं नाव खटल्यातून वगळून, पद्मसिंह पाटील यांना पूर्णपणे क्लीनचिट दिली होती.त्यानंतर अण्णा हजारेंनी याप्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करताना, ' गेल्या तीन वर्षांपासून पवनराजे निंबाळकर प्रकरणाचा छडा का लागत नाही, याची कारणं शोधली गेली पाहिजे. नाहीतर प्रकरण सीबीआयकडे सोपवावं. प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यावर आठ दिवसात पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा छडा लागणारच, 'असं ते म्हणाले होते. तसंच गेल्या तीन वर्षांपासून न्यायासाठी झगडणार्‍या पवनराजे निंबाळकरांच्या कुटुंबियांनी अखेर ह्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे वर्ग करण्यात यश मिळवलं आहे. ऑक्टोबर 2008 साली हे प्रकरण सीबीआयचा सोपवण्यात आलं. त्याबाबत पवनराजे निंबाळकर यांचे सुपत्र ओमराजे निंबाळकर यांनी, ' सीबीआयकडे पवनराजे निंबाळकर प्रकरणाची केस ट्रान्सपर होण्यासाठी चार महिने लागले. त्यामुळे केसप्रकरणी मला दुसरं रिपिटेशन फाईल करावं लागलं, 'अशी माहिती दिली. पद्मसिंह पाटील यांचं व्यक्तिमत्त्व तसं वादग्रस्तच आहे. यापूर्वीही त्यांचा सहकार घोटाळा, शेतकरी अनुदान गैरव्यवहार तसंच कारगिल निधी, पूर आणि भूकंपग्रस्त यांच्या निधीचा गैरवापर सारख्या प्रकरणात सहभाग आहे. पद्मसिंह पाटील हे शरद पवारांचे खंदे समर्थक, त्यांच्या याप्रकरणातल्या सहभागामुळे पवार चांगलेच अडचणीत आलेत. परिणामी राष्ट्रवादीतही कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पक्षाची प्रतिमा कशी स्वच्छ राहील याचा प्रयत्न करत आहे.

close