IBN लोकमत इम्पॅक्ट, बाबीरबुवा जत्रेप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

October 27, 2014 10:57 PM0 commentsViews:

indapur_news_police27 ऑक्टोबर : इंदापूर तालुक्यातल्या रुई गावात बाबीरबुवाची जत्रेत लहान मुलांचा जीव धोक्यात घालून नवस फेडला जातो. तब्बल 20 फुटांच्या उंचीवरून मुलांना दोर बांधून खाली सोडलं जातं. आयबीएन लोकमतनं या अघोरी प्रकाराचा पर्दाफाश केल्यानंतर आता पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केलाय.

लहान मुलांच्या पायाला दोर बांधून तब्बल 15 ते 20 फूट उंचीच्या भिंतीवरून सोडलं जातंय. नवस फेडण्यासाठी बाबीरबुवांच्या जत्रेत…
हा क्रूरपणा होतो. बाबीरबुवा हा नवसाला पावणारा अशी अंधश्रद्धा असल्यानं इथं नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी होते. अगदी एका वर्षांच्या बाळापासून प्रौढांपर्यंत सगळ्यांचा जीव नवसाच्या नावाखाली असा टांगणीला लागतो. पायाला दोर बांधून इतक्या उंचीवरुन खाली सोडताना एखाद्याला गंभीर इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण या मुलांच्या पालकांच्या दृष्टीने मात्र अंगावर शहारे आणणारी ही जावघेणी प्रथा म्हणजे बाबांची भक्ती आहे.

इंदापूर तालुक्यातील रुई गावात 200 वर्षांपूर्वी बाबीरबुवांनी या मंदिराची स्थापना केली होती. तेव्हापासून ही नवस फेडण्याची ही प्रथा सुरू आहे. नवस म्हणजे भक्तांनी देवाला दिलेला शब्द…तो फिरवणार कसा? त्यामुळेच या चिमुकल्यांपैकी अनेकांना या 5 वर्षे 10 वर्षे आपला जीव धोक्यात घालावा लागणार आहे.

जीवाशी खेळ खेळणारी ही प्रथा जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत बंद व्हायला हवी पण कायद्याचं पालन करणारे पोलीस या मंदिराच्या शेजारी असूनही याला अटकाव करत नव्हते. आयबीएन लोकमतने या प्रकाराचा पर्दाफाश केल्यानंतर आता पोलिसांनी याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलंय. अखेर सोमवारी रात्री पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केलाय.
अशा क्रूर प्रथा बंद व्हाव्यात यासाठी अनेकांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. पण पुरोगामी महाराष्ट्रावरचा हा कलंक कधीतरी मिटणार का हा प्रश्न आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close