शपथविधीनंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला 15 दिवसांची मुदत

October 28, 2014 9:41 PM0 commentsViews:

fadanvis_meet_rao28 ऑक्टोबर : भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणारं पत्र दिलं. विधानसभेत सर्वाधिक 123 जागा जिंकल्यामुळे राज्यपालांनी सरकार स्थापन करण्याचं भाजपला निमंत्रण दिलं अशी माहिती फडणवीस यांनी दिली. तसंच शपथविधीनंतर 15 दिवसांत बहुमत सिद्ध करण्याची मुदत राज्यपालांनी दिली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

अखेर आज मुख्यमंत्रिपदाची माळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली. ठरल्याप्रमाणे दुपारी 4 वाजेच्या सुमारास भाजपची विधिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एकमुखाने शिक्कामोर्तब करण्यात आलं. मुख्यमंत्रिपदाची घोषणा केल्यानंतर 31 तारखेला शपथविधी सोहळा वानखेडे स्डेडियमवर आयोजित करण्यात आलाय. या शपथविधी सोहळ्यात भाजपचे छोटेखानी मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे अशी माहिती जे.पी.नड्डा यांनी दिली. त्यानंतर संध्याकाळी नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रकाश जावडेकर, सुधीर मुनगंटीवार, राजीव प्रताप रुडी, ओमप्रकाश माथूर, मित्रपक्षाचे नेते राजू शेट्टी, महादेव जानकर यांच्यासह राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेतली. त्यांनी राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणारं पत्र दिलं. यानंतर देवेंद्र यांनी मीडियाशी संवाद साधला. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे सरकार स्थापन करण्याची राज्यपालांनी निमंत्रण दिलंय. 31 तारखेचा शपथविधी सोहळा संपल्यानंतर 15 दिवसांत बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत दिली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. आमच्याकडे पुरेपुर बहुमत असून 15 दिवसांत बहुमत सिद्ध करून दाखवणार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close