पुण्यातला मेट्रो ट्रेन प्रकल्प अडचणीत

June 10, 2009 8:48 AM0 commentsViews: 19

10 जून, पुणे दिल्लीतील मेट्रो ट्रेनच्या धर्तीवर पुण्यातही मेट्रो सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रो हे प्रकल्प राबविणारे इ. श्रीधरन यांनी याबाबत महापालिकेत सादरीकरण करून दाखवलं. पण प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच त्याला विरोध होऊ लागला आहे. पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांनी या प्रकल्पाचं जोरदार समर्थन केलं आहे. या प्रकल्पात जमीन संपादन करताना 4 एफएसआय देण्यात येईल, असं अहवालात नमूद करण्यात आल्यामुळे पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते आबाराव बागुल यांना त्याला विरोध केला आहे. काँग्रेस पक्षाचा प्रकल्पाला विरोध नसून 4 एफएसआयला विरोध असल्याचं त्यांनी सांगीतलं आहे. याबाबत आयुक्तांनी मात्र ' हा केवळ प्रस्ताव आहे. महापालिकेत चर्चेनंतर त्याला अंतीम मंजुरी देण्यात येईल . त्यावर हरकती सुचना स्वीकारल्या जातील, अशी सावध भूमिका घेतली आहे. स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि रामवाडी ते कोथरूड या दोन मार्गांसाठी हा प्रकल्प असेल. श्रीधरन यांनी दिलेल्या नियोजनानुसार हा प्रकल्प 2014 पर्यंत पूर्ण होणार आहे. यासाठी साडे नऊ हजार कोटींचा खर्च येणार आहे. प्रकल्पाच्या प्राथमिक प्रस्तावाला झालेला विरोध पाहता, प्रकल्प मंजूर होईपर्यंत यावरून आणखी गदारोळ होण्याची शक्यता आहे.

close