मुंबईसह राज्यभरात डेंग्यूचं थैमान

October 30, 2014 12:41 PM0 commentsViews:

dengu30 ऑक्टोबर :  मुंबईसह राज्यभरात डेंग्यूच्या तापाने थैमान घातलं आहे. वाढत्या अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईतल्या केईएम हॉस्पिटलच्या एका निवासी डॉक्टरचा 26 ऑक्टोबरला डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. केईएम मेडिकल कॉलेजमध्ये तिसर्‍या वर्षाला असणार्‍या श्रृती खोब्रागडेला डेंग्यू झाल्याचं निदान 24 ऑक्टोबरला झालं आणि पुढच्या दोन दिवसातच तिचा मृत्यू झाला. हॉस्पिटलच्या परिसरातल्या अस्वच्छतेमुळेच डेंग्यू पसरल्याचं निवासी डॉक्टर्सचं म्हणणं आहे. पण अजूनही हॉस्पिटल परिसरातली घाण साफ न होत असल्याने मार्डचे सदस्य असलेले डॉक्टर प्रशासनाविरोधात आंदोलन करत आहेत.

सोलापुरात डेंग्यूमुळे एका 19 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. पूजा सुभाष चाबुकस्वार असं मृत तरुणीचं नाव आहे. ती सोलापुरात होटगी रोडवरील हत्तुरे नगरात राहत होती. दोन दिवसांपासून पूजावर सोलापुरातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोलापुरात आतापर्यंत डेंग्यूचे 16 संशयीत रुग्ण आढळले होते. त्यापैकी एक पॉझिटिव्ह आढळलाय. पूजा ज्या परिसरात राहयची त्या हत्तूरे नगराच्या पाठीमागे मोठ्याप्रमाणात दलदल आणि घाणीचं साम्राज्य आहे. त्यामुळे या परिसरात राहणार्‍या पाच हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बारामती तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूसदृश्य आजाराच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होतं आहे. दररोज बारामतीतल्या खासगी हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. त्यातल्या अनेक रुग्णांना प्लेटलेट्सची आवश्यकता भासत आहे. मात्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रक्त आणि प्लेटलेट्स मिळविण्यासाठी नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहेत. प्रशासनानंही डेंग्यूच्या साथीवर गेल्या काही दिवसांपासून उपाययोजना सुरू केल्या आहेत.

दुसरीकडे राज्यात वाढणार्‍या डेंग्युच्या पेशंट्सच्या उपचारासाठी सर्वात महत्वाच्या असलेल्या प्लेटलेट्सचा आणि रक्ताचा पुरवठाही कमी प्रमाणात होत आहे. यासाठी ब्लड बँक संचालकांनीही नागरिकांना ब्लड आणि प्लेटलेटस डोनेट करण्याचं आवाहन केलं आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close