कळणे गावातलं मायनिंगविरोधी आंदोलन चिघळलं

June 13, 2009 11:16 AM0 commentsViews: 10

13 जून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कळणे गावात तणाव वाढू लागला आहे. ग्रामस्थांचा मायनिंग विरोधातला संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. त्यात पोलीस निरिक्षक नंदकुमार देशमुख यांनी खाकीचा रुबाब दाखवत वृध्द ग्रामस्थांना मारहाण केल्यामुळे हा संघर्ष चिघळला. पोलिसांनी सरपंच सुनिता भिसे आणि जान्हवी देसाई यांच्यासह एकूण चौघांना अटक केली आहे. ' पोलिसांनी जमावबंदीचे आदेश दिल्यामुळे गावकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही आलो आहोत. पोलिसांनी रामा देसाई यांना मारहाण केली आणि बायकांना धक्काबुक्की केली. त्यावर आम्ही एनसी करण्याचा प्रयत्न केला पण कोणीही त्याची दखल घेतली नाही, ' अशी प्रतिक्रिया कळणे गावच्या सरपंच सुनिता भिसे यांनी दिली. कळणेमध्ये शुक्रवारी मिनरल्स ऍन्ड मेटल्स या मायनिंग कंपनीला वादग्रस्त सर्वे नं.60मधील आपली यंत्रसामुग्री सर्व्हे नं. 57 मध्ये न्यायची होती. पण ही मशिनरी नेताना पोलिसांनी मायनिंग कंपनीला संरक्षण देत 144 कलम लागू केल्याने कळण्यातले ग्रामस्थ भडकले. त्यामुळे गावातल्या शंभर गावकर्‍यांनी गावातल्या मंदिरात सत्याग्रह सुरू केला आहे. या प्रकरणी आणखी गावकर्‍यांना अटक होण्याची शक्यता आहे. जमावबंदी आदेशाचं कारण दाखवत सिंधुदुर्ग पोलिसांनी कळणे ग्रामस्थांचं हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्यात पोलिसांकडून काही ग्रामस्थांना मारहाणही करण्यात आली आहे. चिडलेल्या महिलांनीही पोलिसांवर चपलांचा मारा केला. मायनिंग कंपनी कोणत्याही परिस्थितीत कळणे गावात मायनिंग सुरू करण्याच्या, तर ग्रामस्थ विरोधाच्या पवित्र्यावर ठाम आहेत.

close