देवेंद्र फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर

November 2, 2014 12:28 PM0 commentsViews:

cabinet

02 नोव्हेंबर : महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी नव्याने स्थापन झालेल्या भाजप सरकारचे खातेवाटप आज रविवारी जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती स्वतःकडेच ठेवली असून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना महसूल मंत्रालय देण्यात आले आहे. खडसेंकडे वक्फ बोर्ड, अल्पसंख्याक मंत्रायल, कृषी खातं, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क खात्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अर्थ आणि वन खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शालेय, उच्चशिक्षण, वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण या शिक्षणसंबंधीत खात्याची जबाबदारी विनोद तावडेंकडे सोपवण्यात आली आहे. सांस्कृतिक मंत्रालय आणि मराठी भाषा संवर्धन विभाग या विभागाचा कार्यभारही तावडेंकडेच देण्यात आला आहे. तर, चंद्रकांत पाटील यांच्याकडे सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग खाते देण्यात आले. पंकजा मुंडे – पालवे यांच्याकडे ग्रामविकास खात्यासोबतच जलसंधारण मंत्रालय, महिला आणि बाल कल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. विष्णू सावरा यांना आदिवासी विकास मंत्रालय आणि सामाजिक न्यायमंत्रालय देण्यात आले आहे. मुंबईतील आमदार प्रकाश मेहतांकडे खाण आणि उद्योग खाते देण्यात आले असून संसदीय कार्यमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभारही मेहतांकडेच दिला आहे. जाहीर न झालेली उरलेली खातीही मुख्यमंत्र्यांकडेच असल्याचे सांगण्यात आले आहे. 

आदिवासी आणि समाजकल्याण राज्यमंत्रीपदाचा कार्यभार दिलीप कांबळे यांच्याकडे तर विद्या ठाकूर यांच्या ग्रामविकास, महिला आणि बालकल्याण राज्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नऊ मंत्र्यांचा शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर भव्य दिव्य शपथविधी पार पडला. त्यानंतर सगळ्यांचं लक्ष खातेवाटप कधी होणार याकडे लागले होतं. शनिवारी खातेवाटप करू असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र सर्व मंत्र्यांनी आपल्या मनाप्रमाणेच खाते देण्याचा आग्रह केल्याने खातेवाटप होऊ शकले नाही. अखेरीस रविवारी खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या ‘मिनीमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स’ या संकल्पनेनुसारच राज्यातील मंत्रिमंडळही छोटं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close