काळा पैसा भारतात परत आणणारच – मोदी

November 2, 2014 1:24 PM1 commentViews:

Man ki baat

02 नोव्हेंबर : विदेशी बँकांमध्ये असलेला काळा पैसा भारतात परत आणणारच, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. विदेशातील बँकांमध्ये किती काळा पैसा आहे याचा नेमका आकडा आमच्याकडे उपलब्ध नाही. मात्र हा काळा पैसा भारतातील गरीबांचा असून त्यातील पै न् पै परत आणू असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. विदेशातील बँकांमध्ये दडवलेल्या काळा पैशावरुन सरकारवर टीकेची झोड उठली असतानाच केंद्र सरकार या दिशेने योग्य पाऊल उचलत असल्याचे सांगत मोदींनी सरकारची पाठराखणही केली.

पंतप्रधानांनी आज रविवारी सकाळी रेडिओवर ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे दुसर्‍यांदा देशातल्या जनतेशी संवाद साधला. या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमात त्यांनी काळ्या पैशावरची आपली भूमिका मांडली. परदेशात किती काळा पैसा आहे, त्याच्याशी आपल्याला देणंघेणं नाही. पण, गरिबाचा पैसा देशात परत यायलाच हवा आणि त्यासाठीच्या प्रयत्नात अजिबात कसूर ठेवणार नाही, अशी हमी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे.

या कार्यक्रमात बोलताना त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर देशवासीयांशी मुक्त संवाद साधला. ‘स्वच्छ भारत अभियाना’ला मिळालेल्या यशाबद्दल जनतेचे आभार मानत त्यांचं कौतुक केलं. या अभियानाचा सर्वात जास्त प्रभाव लहान मुलांवर पडल्याचं त्यांनी सांगितलं. अस्वच्छतेचा थेट संबंध हा गरिबांच्या आरोग्याशी आहे. तेव्हा स्वच्छता ठेवणं म्हणजे एक प्रकारची गरिबांची सेवाच असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच या अभियानानंतर जेव्हा कधी वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आपल्याशी बोलतात, तेव्हा त्यांच्या बोलण्यात सामाजिक विषय असतोच, असंही पंतप्रधानांनी सांगितलं. प्रत्येकालाच कुठली तरी सामाजिक जबाबदारी उचलायची असल्याचं त्यांनी सांगितलं.

पंतप्रधानांनी आपल्या पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात कुठलातरी शारीरिक व्यंग असलेल्या मुलांचा विषय काढला होता. त्यावर मनुष्यबळ विकास मंत्रालयानं अशा मुलांसाठी विशेष शिष्यवृत्ती सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच केंद्रीय विद्यालय आणि विद्यापीठांमध्ये विशेष मुलांसाठी गरजेच्या असलेल्या सुविधा उदाहणार्थ तिचाकी सायकली, वेगळे टॉयलेट्स, अशा सोयींसाठी प्रत्येकी 1 लाख निधी देण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्यानं घेतल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

सियाचीनमध्ये भारतीय जवानांबरोबर साजरी केलेल्या दिवाळीची आठवणही यावेळी त्यांनी सांगितली. सीमेचं रक्षण, नैसर्गिक आपत्तीत मदत या कामांसाठी त्यांनी जवानांना सलाम केला. तर ब्रिटेनमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत 140 देशांना मागे टाकत गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल जवानांचं अभिनंदनही केलं. आपल्या पुढच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात व्यसनाधीनतेच्या वाढत्या विळख्याबद्दल बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणांमध्ये दारु, ड्रग्ज अशी व्यसनाधीनता वाढत असल्याबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. तसंच याबद्दल लोकांना काही बोलायचं असेल, तर तेही कळवण्याचं आवाहन केलं. दरम्यान, हिवाळा ऋतू आरोग्यासाठी उत्तम असल्याने सर्वांनी त्याचा भरपूर फायदा करून घ्यावा, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आपल्या ‘मन की बात’ची सांगता केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • MALAJI DUDHALWAD

    your well come

close