ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचं निधन

November 3, 2014 8:41 AM0 commentsViews:

sadashiv amrapurkar
03  नोव्हेंबर :  रंगभूमी ते मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ आणि चतुरस्त्र अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे रात्री 2.45 वाजता निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले अनेक महिने ते फुफ्फुसाच्या कॅन्सरशी लढा देत होते. ते 64 वर्षांचे होते.

सदाशिव अमरापूरकर यांचा 11 मे 1950 रोजी अहमदनगरमध्ये जन्म झाला. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर आपली अभिनयाची कारकीर्द सुरू केली. जवळपास 50 व्यावसायिक नाटकांत त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. 1971 ते 1979 सलग 8 वर्षं त्यांनी रंगभूमीवर 50हून अधिक नाटकांत अभिनय केला आणि काही नाटकांचं दिग्दर्शनही केलं. 1979ला त्यांच्या कारकीर्दीला वळण देणारी भूमिका त्यांना मिळाली. त्यांनी ’22 जून 1897′ या सिनेमात रंगवलेली बाळ गंगाधर टिळकांची भूमिका प्रचंड गाजली आणि इथूनच त्यांचा रंगभूमीवरून मोठ्या पडद्यावरचा प्रवास सुरू झाला. यानंतर त्यांनी मागे वळून कधीच पाहिलं नाही. बाळ गंगाधर टिळक या भूमिकेमुळे सदाशिव अमरापूरकरांना त्यांच्या चित्रपट कारकीर्दीतला सर्वात गाजलेला सिनेमा मिळाला. दिग्दर्शक गोविंद निहलांनीचा ‘अर्धसत्य’ यातील त्यांची खलनायकाची भूमिका प्रचंड गाजली, त्यासाठी त्यांना आपला पहिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. त्यानंतर पुराना मंदिर, मुद्दत, वीरु दादा, हुकुमत, फरिश्ते या सिनेमातील त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या.

‘सडक’मध्ये त्यांनी साकारलेली महारानी अतिशय गाजली. खलनायकाच्या भूमिकेला त्यांनी अनोखा साज चढवला. अमरापूरकरांचे संवादफेक आणि खलनायकांच्या भूमिकांमधील वैविध्य प्रेक्षकांना अतिशय भावली. सदाशिव अमरापूरकरांनी खलनायक रंगवले तसे काही विनोदी भूमिकाही तितक्याच सफाईपणे सादर केल्या. आंखें, इश्क, कुली नंबर वन, आँटी नंबर वन, जयहिंद यातील भूमिकाही लक्षात राहिल्या. 250 हून अधिक सिनेमांमध्ये अमरापूरकर यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. कलाविश्वात रमणारा हा माणूस विचारवंतही होता.

राजकारण आणि सामाजिक परिस्थिती यावर अमरापूरकरांची जबरदस्त पकड होती. सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही अमरापूरकर यांची विशेष ओळख होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ‘जनलोकपाल’ मागणीच्या आंदोलनाला त्यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला होता. तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या म्हणजे हे राज्य अराजकतेकडे चालले आहे, असेच समजावे लागेल. आता तरी सरकारने जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करून त्यांना श्रद्धांजली वाहावी, अशी भूमिका अमरापूरकर यांनी मांडली होती.

सदाशिव अमरापूरकर यांचे विशेष गाजलेले सिनेमे

 • अर्धसत्य
 • सडक
 • हुकूमत
 • कालचक्र
 • इश्क
 • हम साथ साथ है
 • कच्चे धागे
 • आँटी नं.1
 • कुली नं.1
 • गुप्त
 • सावरखेड एक गाव

फिल्मफेअर पुरस्कार

 • 1984 : सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – अर्धसत्य
 • 1988 : नामांकन – सर्वोत्कृष्ट खलनायक – कालचक्र
 • 1991 : सर्वोत्कृष्ट खलनायक – सडक
 • 1998 : नामांकन – सर्वोत्कृष्ट खलनायक – इश्क

दरम्यान,  सदाशिव अमरापूरकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  एक अष्टपैलू आणि सर्वच पिढ्यांमध्ये लोकप्रिय असलेले अभिनेता म्हणून सदाशिव अमरापूरकर नेहमीच आपल्या आठवणीत राहतील. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, असं मोदी म्हणाले आहेत. तर बिग बी यांनी काय ट्वीट केलं आहेत. कोलकात्यात सकाळी सकाळीच सदाशिव अमरापूरकर यांच्या निधनाची बातमी कळली. तो सहकारी आणि अभिनयाची दैवी देणगी असलेला माणूस होता. एखादा सहकारी अचानक जातो तेव्हा त्याच्यासोबत घालवलेला काळ, त्यांच्यासोबत केलेलं काम याबाबत अचानक पोकळी जाणवते, अशी प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी दिली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close