वाघा बॉर्डरजवळच्या आत्मघातकी हल्ल्यातील मृतांची संख्या 65वर

November 3, 2014 11:24 AM0 commentsViews:

wagah-border bomb attack

03  नोव्हेंबर :  भारत-पाकिस्तान सीमेवरील पाकिस्तानच्या हद्दीतील वाघा सीमेवर काल (रविवारी) संध्याकाळी आत्मघातकी हल्ला झाला. त्यातल्या मृतांची संख्या 65वर गेली आहे, तर 200 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 12 जणांची प्रकृती चिंताजनक असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

भारत-पाकिस्तानच्या सीमेवर रोज संध्याकाळी 6च्या सुमारास दोन्ही देशांच्या लष्कारांचे जवान एक विशेष परेड करतात. ही परेड बघण्यासाठी दोन्ही देशातले हजारो पर्यटक उपस्थित असतात. हा कार्यक्रम संपल्यावर रविवारी संध्याकाळी पाकिस्तान हद्दीच्या पार्किंगमध्ये बाँबस्फोट करण्यात आला. या हल्ल्यात तीन पाकिस्तानी रेंजर्सही ठार झाल्याचंही सांगण्यात येत आहे. मोठया प्रमाणात लोक जमा झाल्याने मृतांची संख्या वाढली माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. सध्या पाकिस्तानी रेंजर्सनी हा संपूर्ण भाग आपल्या ताब्यात घेतला असून या आत्मघातकी बाँबस्फोटानंतर भारताच्या सीमेवरही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या विनंतीवरून बुधवापर्यंत वाघा सीमेवरील दोनही देशांचे बिटींग द रिट्रीट म्हणजे ध्वज संचलनाचा कार्यक्रम बंद करण्यात आले आहे.

दरम्यान, अल-कायदा संघटनेशी निगडित असलेल्या जनादुल्ला या गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरुवातीला हा स्फोट गॅस सिलिंडरचा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र हा आत्मघातकी हल्ला असल्याचे पाकिस्तानी अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close