नाशिकचे पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांची बदली रद्द

June 15, 2009 3:01 PM0 commentsViews: 10

15 जून, नाशिक नाशिकचे पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांची बदली रद्द केल्याची घोषणा गृहमंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केली. नाशिककरांनी ही बदली रद्द व्हावी म्हणून गेल्या दोन दिवसांपासून सरकारच्या विरोधात आंदोलन केलं होतं. याच दबावामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. विष्णुदेव मिश्रा यांनी नाशिक मधील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांना सामान्य नागरिकांचा पाठिंबा मिळत होता. विष्णुदेव मिश्रा यांनी कोणत्याही प्रकारची मागणी केली नसताना, त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या काही जणांना तडीपारीच्या नोटीस दिल्याने त्यांची बदली झाली असा आरोप सरकारवर होत होता. त्यानंतर विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली होती. अण्णा हजारे यांनी देखील ही बदली रद्द व्हावी म्हणून सरकारला संध्याकाळपर्यंतची मुदत दिली होती. अखेर राज्य सरकारने नमतं घेत विष्णुदेव मिश्रा यांची बदली रद्द केली आहे.

close