विहिरी बनल्या शोभेच्या वस्तू !

November 3, 2014 8:41 PM0 commentsViews:

भास्कर मेहरे, यवतमाळ

03 नोव्हेंबर : महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत सरकारनं काही शेतकर्‍यांना विहिरींचे वाटप केलं. मात्र 3-4 वर्षांपासून या विहिरींना वीज पुरवठा नसल्यामुळे त्या केवळ शोभेच्या वस्तू बनल्यात.

अल्पभूधारक शेतकर्‍यांचा विकास व्हावा, या हेतूनं बाभूळगाव तालुक्यात सरकारने 242 विहिरींचे वाटप केले. शेतकर्‍यांनी विहीर खोदल्या. 50 फुट खोल असलेल्या या विहिरींना भरमसाठ पाणी लागलं. शेतकर्‍यांनी वीज जोडणीसाठी महावितरणकडे रीतसर अर्ज केला. पण 4 वर्षं लोटूनही शेतकर्‍यांना वीज मिळाली नाही. शेतकर्‍यांनी वीज पुरवठा मिळावा म्हणून ‘महावितरण’कडे अर्ज केला. त्यानंतर वीज कंपनीने या शेतकर्‍यांना 6,650 रु भरण्याचे पत्र दिले. वीज मिळावी म्हणून काही शेतकर्‍यांनी घरचे पशु धन विकले तर काहींनी पत्नीचे दागिने विकुन वीज पुरवठा मिळण्यासाठी पैसे भरले. मात्र अजूनही शेतकर्‍यांना वीज मिळाली नाही.

2004 पासून विहिरी मिळण्यासाठी प्रयत्न केला व आता हे शेतकरी वीज मिळण्यासाठी 2011 पासून ‘महावितरण’चे दरवाजे झिझवत आहेत. मात्र याची कोणालाच पर्वा नाही. शासकीय अधिकार्‍यांना याबद्दल जाब विचारला असता, या योजनेसाठी सुरुवातीला 1 लाख 90 हजार रुपये अनुदान दिले जात होते आता तर ते अनुदान 3 लाख रुपये झाल्याचे त्यांनी म्हटलंय. असं असलं तरीही शेतकर्‍यांना त्याचा लाभ झालेला पाहायला मिळत नाही. ज्या शेतकर्‍यांनी तर वीज मिळणार हे गृहीत धरून पिकांची लागवड केली त्याचं पिक आता धोक्यात आलं आहे. अधिकारी आपल्या खांद्यावरची जबाबदारी ठेकेदारावर ढकलून मोकळे होतात तर ठेकेदार अधिकार्‍यांवर जबाबदारी झटकतात.

आता परिस्थिती अशी आहे की, वीज मिळाली नाही…विहिरींचे पाणी विहिरींतच राहिलंय आणि तहानलेली पीकं शेतातच जळत
राहिली. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close