बेळगावी नाव अमान्य, सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार -मुख्यमंत्री

November 3, 2014 9:05 PM1 commentViews:

devendra_fadanvis_nagpur_pc03 नोव्हेंबर : एकनाथ खडसे काय म्हणाले ते मी ऐकलेलं नाही, मात्र खडसेंनी असं म्हणणं शक्य नाही. कारण, खडसेंनीच माझं नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवलं होतं असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंना दिलंय. तसंच ‘बेळगावी’ हे नाव मान्य नाही. याबाबत सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडणार असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. वेगळा विदर्भ होईल पण वेगळा विदर्भ शांततेनं आणि रक्तपात न घडवता होईल असं सूचक विधानही त्यांनी केलं.

मुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस नागपूरला पोहचले. आज त्यांच्या नागपूर दौर्‍याचा दुसरा दिवस आहे. दुपारी त्यांनी रखडलेल्या मिहान प्रकल्पासंदर्भात अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्याअगोदर सकाळी त्यांनी रेशीमबागमधल्या हेडगेवार स्मृती भवनाला भेट देवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी स्मृती भवनातर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला. संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नागपूरच्या मिहान प्रकल्प पूर्ण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं स्पष्ट केलंय. यासंदर्भात आपण नितीन गडकरींसोबतही चर्चा केली आहे. मात्र मिहानच्या सेझमध्ये येण्यासाठी उद्योजक उत्सुक नाहीत. कारण, मिहानमधली वीज महागडी आहे. मिहानमध्ये ओपन ऍक्सेसमधून वीज देणाच्या विचार सुरू आहे. सध्या वीजेचे असलेले दर 11 ऐवजी साडेचार रुपयाच्या भावानं वीज देण्याचा आम्ही प्रयत्न करू याबद्दल येत्या 10 दिवसांत निर्णय घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. तसंच मिहानसाठी वेगळे आयटीआय पार्क आणि विद्यार्थ्यांना उच्च तंत्रशिक्षण देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच छोट्या राज्यांची भूमिका ही भाजपचीच भूमिका आहे. मात्र वेगळा विदर्भ शांततेनं आणि रक्तपात न घडवता होईल. विदर्भ कधी वेगळा होईल, ते आताच सांगता येणार नाही असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. शिवसेनेसोबत योग्य मार्गानं चर्चा सुरू आहे. शिवसेना जर सत्तेत सहभागी झाली तर त्यांना कुठली खाती द्यायची त्यासंदर्भातला निर्णय अद्याप झालेला नाही. सध्या मीच गृहमंत्री आहे आणि कदाचित भविष्यातही राहीन असंही त्यांनी सांगितलं. पाथर्डी तालुक्यातील जवखेडा दलित हत्याकांडाचा छडा लावण्यात येईल. यासाठी पोलीस महासंचालकांना योग्य ते चौकशीचे आदेश देण्यात आले असून सातत्यानं ते संपर्कात आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ravi Kesarkar

    उत्तम निर्णय ! पण देवेंद्र साहेब फक्त सुप्रीम कोर्टात बाजू मांडून काम कोणार नाही , योग्य आणी अभ्यासू वकिलांची फौज तयार ठेवा !!

close