वसंत गीतेंचं बंड थंड, सर्व नगरसेवक ‘इंजिना’त परतले

November 4, 2014 4:09 PM2 commentsViews:

vasant_gite_nashik04 नोव्हेंबर : मनसेच्या बालेकिल्ल्याला हादरा देणारे मनसेचे माजी आमदार वसंत गीते यांचं बंड आता थंड पडलंय. सर्व मनसेच्या नगरसेवकांनी गीतेंच्या सुरात सूर मिसळण्यास नकार देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचा निर्णय घेतल्यामुळे गीते एकाकी पडले आहे. तसंच राज यांनी आपला नाशिक दौराच रद्द केल्यामुळे गीतेंना तलवार म्यान करावं लागलंय.

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर मनसेत सोमवारी अचानक राजीनामा सत्र सुरू झाले. नाशिकच्या बालेकिल्ल्यात प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार वसंत गीतेंनी राजीनामा देऊ केला. त्यांच्या पाठोपाठ जिल्हाध्यक्षांसह 150 पदाधिकार्‍यांनी आपले राजीनामे दिले. आपल्या बाजूने सर्व नगरसेवक आहेत अशी वल्गना करत वसंत गीतेंनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. एवढंच नाहीतर मनसेचे नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चाही सुरू झाली. सोमवारी रात्रीपर्यंत मनसेच्या नगरसेवकांमध्ये काथ्याकूट सुरू होता. पण अखेरीस सर्व नगरसेवकांनी राज यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. या नाराजीनाट्याच्या समाचार घेण्यासाठी खुद्ध राज ठाकरे नाशिकमध्ये येणार होते. पण त्यांची मुलगी उर्वशी हिचा रविवारी अपघात झाला. तिच्यावर हिंदूजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. त्यामुळे राज यांनी आपला दौरा रद्द केलाय. मात्र, त्या निमित्तानं गीतेंना एकाकी पाडण्यात मनसेला यश आल्याचं चित्र आहे. सर्व नगरसेवक पक्षासोबत असल्याची मनसेनं खातरजमा करून घेतली आहे. पण दुसरीकडे शिवसेना आणि भाजपनं गीतेंना आमंत्रण दिलंय, त्यानुसार त्यांनी आज सकाळी भाजपच्या नेत्यांची भेटही घेतली. पण गीतेंनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा सुरू आहे असं सांगून अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केली नाही. मात्र राज यांचा नाशिक दौराच रद्द झाल्यानं आता त्यांचं बंड थंड पडल्याचं दिसतंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ravi Kesarkar

    राज ठाकरे यांच्यासाठी थोडीशी का होईना दिलासादायक बातमी आहे …गिते ही परत येतील असे वाटते

  • Adv Nachiket

    या चिमण्यांनो…परत फिरा रे..घराकड़े अपुल्या..

close