सेनेनं भाजपसमोर गुडघे टेकले, राणेंनी डागली तोफ

November 4, 2014 6:28 PM3 commentsViews:

rane on uddhav04 नोव्हेंबर : शिवसेनेची अवस्था केविलवाणी झालीये. सत्तेसाठी शिवसेनेनं भाजपसमोर गुडघे टेकले असून सपेशल लाचारी पत्कारली आहे. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी याला लाथ मारून विरोधी बाकावर बसणे पसंत केले असते अशी खरमरीत टीका काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केली. तसंच देवेंद्र फडणवीसांकडे निर्णयक्षमता नाही. प्रशासन चालवण्यासाठीचं चातुर्य नाही. राज्य सरकार आमच्याप्रमाणचे निर्णयासाठी दिल्लीवर अवलंबून आहेत, असा टोलाही राणेंनी लगावला.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रचारसमितीचे प्रमुख नारायण राणे यांचा त्यांच्याच होमग्राऊंडमध्ये धक्कादायक पराभव झाला. या पराभवातून सावरल्यानंतर नारायण राणे यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राणेंनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत असल्याचं जाहीर केलं. कुडाळमधून झालेला माझा पराभव मी स्वीकारतो. कोकणी माणसानं मला विजयही मिळवून दिला आणि पराभवाची चवही चाखवली मात्र कामं करुन माझा पराभव झाला आहे अशी भावना राणेंनी व्यक्त केली. तसंच राणेंनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही पराभवाचं खापर फोडलं. उमेदवारांना पुरेशी आर्थिक रसद न मिळाल्यानं पराभव झाला, रसद पुरवण्याची जबाबदारी चव्हाणांची होती पण त्यांनी आपल्या बाजूने पूर्ण काम केलं नाही असा आरोप राणेंनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी तुटली तेव्हाच सत्ता जाणार हे उघड होतं अशी कबुलीही त्यांनी दिली.

‘फडणवीस सरकार अपयशी ठरेल’

त्यानंतर राणेंनी आपला मोर्चा नवनिर्वाचित राज्य सरकारकडे वळवला. राणेंनी सुरुवातील देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. आणि दुसर्‍याच क्षणाला जोरदार तोफ डागली. देवेंद्र फडणवीस यांनी टोलबंदीची मागणी केली होती. काल नागपूरमध्ये टोल धोरणाचा आढावा घेणार असल्याचं स्पष्टही केलं होतं. पण आता मात्र त्यांनी यू टर्न का घेतला ? असा सवाल राणेंनी उपस्थित केला. फडणवीस हे प्रामाणिक आहेत. मात्र, त्यांच्याकडे प्रशासकीय चातुर्य नाही. भाजप सरकारमध्ये एकही असा मंत्रिपदाला साजेशा नेता नाही. त्यामुळे, भाजप आश्वासनं पूर्ण करू शकेल असं वाटत नाही. यांचं सरकार दिल्लीवरच अवलंबून राहणार आहे. त्यामुळे ते अपयशी ठरतली अशी टीकाही राणेंनी केली.

‘सेनेनं भाजपसमोर गुडघे टेकले’

शिवसेनेची अवस्था केविलवाणी झाली आहे. सत्तेसाठी शिवसेनेनं भाजपसमोर लोटांगण घेतलंय. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी लाथ मारुन विरोधी बाकावर बसणे पसंत केले असते. पण त्यांचे सुपूत्र उद्धव ठाकरे सगळं उलटं वागताय. नेहमी उठसूठ अस्मितेवर गप्पा मारणार्‍या उद्धव ठाकरे यांनी आता यावर बोलू नये असा टोला राणेंनी लगावला.तसंच शिवसेनेने सध्या स्वीकारलेली लाचार भूमिका ही फक्त उद्धव ठाकरेंच्या स्वार्थासाठी असल्याची टीका नारायण राणेंनी केलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Sham Dhumal

  बंड केलं आणि थंड झाल्यावर कॉंन्ग्रेससमोर राणेसाहेबांनी गुडघे टेकले ना?
  आता दुसरीकडे बोट का दाखवतात?

 • Sham Dhumal

  निवडणुक प्रचारात तोंडाचा अमाप वापर करुन तोंडघशी पडलेले नारायण राणे आता पुन्हा तोंडसुख घ्यायचा प्रयत्न करत आहेत.

 • Ravi Kesarkar

  दुसऱ्या सांगे ब्रह्म ज्ञान ” दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणी आपण स्वतः कोरडे पाषाण ” अशी अवस्था आहे तुमची राणे साहेब !!

close