राज ठाकरे भडकले, सर्व पदाधिकार्‍यांचे राजीनामे स्वीकारले

November 4, 2014 6:57 PM0 commentsViews:

raj on gite04 नोव्हेंबर : नाशिकमध्ये मनसेच्या बालेकिल्ल्यात शिलेदारांनी राजीनामास्त्र उगारल्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच भडकले आहे. मनसेच्या ज्या पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले त्या सर्वांचे राजीनामे मी स्वीकारलेले आहेत असं राज ठाकरेंनी जाहीर केलंय. राजीनामे स्वीकारल्यामुळे माझ्यासोबत कोण आहे आणि कोण नाही हे तरी कळेल, असंही राज यांनी ठणकावून सांगितलं.

नाशिकच्या बालेकिल्ल्यात प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार वसंत गीतेंनी राजीनामा देऊ केला त्यांच्या पाठोपाठ जिल्हाध्यक्षांसह 150 पदाधिकार्‍यांनी आपले राजीनामे दिल्यामुळे मनसेला एकच हादरा बसला. एवढंच नाहीतर वसंत गीतेंसह अनेक नगरसेवक भाजप आणि सेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली. पण आज वसंत गीतेंचं बंड थंड झालं. सर्व नगरसेवकांनी राज यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. या नाराजीनाट्याच्या समाचार घेण्यासाठी खुद्ध राज ठाकरे नाशिकमध्ये येणार होते. पण त्यांची मुलगी उर्वशी अपघातामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल असल्यामुळे दौरा रद्द केला. पण राज या सगळ्या प्रकरणाचा सडेतोड समाचार घेतला. राज यांनी संध्याकाळी याबाबत पत्र प्रसिद्ध केलंय. ‘ज्या ज्या पदाधिकार्‍यांनी माझ्याकडे राजीनामे पाठविलेले आहेत, त्या सर्व राजीनाम्यांचा पक्षाध्यक्ष म्हणून स्वीकार करीत आहे. आजच्या परिस्थितीत कोण-कोण माझ्या सोबत आहेत, हे ही यामुळे मला कळेल !’ असं या पत्रात नमूद केलंय.  मात्र वसंत गीतेंसोबत काल राजीनामे दिलेल्या मनसेच्या अनेक पदाधिकार्‍यांनी आज राजीनामे मागे घेतलेले आहेत आणि मनसेसोबतच आपण कायम असल्याचा दावा केला. त्यामुळे मनसेत सभं्रमाची परिस्थिती निर्माण झालीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close