एक 11 वर्षांची चिमुरडी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेते तेव्हा…

November 4, 2014 7:54 PM0 commentsViews:

04 नोव्हेंबर : राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं सर्वसामान्यांना सहज शक्य नाही. पण एका अकरा वर्षाच्या चिमुरडीने नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटच घेतली नाही तर त्यांची सडेतोड मुलाखतीही घेतली. दृष्टी हरचंदानी असं या मुलीचं नाव असून तिच्या या चिकाटीचं मुख्यमंत्र्यांनीही तोंडभरुन कौतुक केलं आणि शाब्बासकीही दिली.

मुंबईतील मलबार हिलवरील ‘बे व्ह्यु’ सोसायटीत राहणारी दृष्टी हरचंदानी ही जे. बी. पेटीट हायस्कूलमध्ये पाचव्या वर्गात शिकते. दृष्टीला सामाजिक शास्त्र विषयात प्रभावशाली व मान्यवर व्यक्तींचा मुद्दा अभ्यासासाठी आहे. त्यामुळेच तिने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याचं मनाशी पक्क केलं. यासाठी तिने थेट सह्याद्री अतिथीगृह गाठले. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचणे एवढे सोपे थोडी.अतिथीगृहावर या निरागस चिमुरडीच्या सुरक्षेच्या कारणास्तव रोखण्यात आलं. परंतु, आजपर्यंत अनेक वृत्तवाहिनी, वृतपत्राचे संपादक मुलाखतीसाठी येत असतात पण एक चिमुरडी आपली मुलाखत घेण्यासाठी आली याची माहिती फडणवीस यांच्या कानी पडता तेही अवाक् झाले. मुख्यमंत्र्यांनी मोठ्या आस्थेनं दृष्टीला बोलावून घेतले. दृष्टीनेही नव्या सीएम साहेबांची जोरदार मुलाखत घेतली. तिच्या भीम पराक्रमाबद्दल आयबीएन लोकमतने तिची प्रतिक्रिया जाणून घेतली तरी दृष्टीने भाजपमध्ये जर प्रवेशाची संधी मिळाली तर नक्की प्रवेश करेन आणि पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री तरी होईल अशी निरागस इच्छा तिने बोलून दाखवली.

या मुलाखतीबद्दल मुख्यमंत्री म्हणतात, “मुंबईत सरकारी अतिथीगृहात काल कामात गुंतलेला असताना एक अनोखी चिठी मला मिळाली. दृष्टी हरचंदानी या मुलीला माझी मुलाखत घ्यायची होती. सुरक्षा यंत्रणेमुळे तिला प्रवेश मिळत नव्हता. तिला माझी मुलाखत तर घ्यायचीच होती. मी तिला फोन करावा यासाठी तिने एक नंबर दिला होता किंवा तिच्या पत्त्यावर कोणाला तरी पाठवावे यासाठी घराचा पत्ताही दिला होता. आपण मुख्यमंत्र्यांशीच बोलत आहोत, याची तिला खात्री करून घ्यायची होती. मला तिच्या चिकाटीचे आणि उत्सुकतेचे कौतुक वाटले. मी, तिला आत बोलावून घेतले. मुलाखतीत तिने शिक्षण क्षेत्रासाठी काय करणार आणि महागाई कशी कमी करणार असे प्रश्न विचारले. या अनोख्या मुलाखतीची मलाही गंमत वाटली. दृष्टी आणि राज्यातील सर्व बालकांचे चांगले भवितव्य घडावे यासाठी आमचे सरकार प्रयत्न जरूर प्रयत्न करेल.”

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close