महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणं म्हणजे रखवालदारानेच ‘घोटाळा’ केल्यासारखं- शिवसेना

November 5, 2014 1:13 PM0 commentsViews:

20devendra-uddhav

04 नोव्हेंबर :  विदर्भातील मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणे म्हणजे महाराष्ट्राच्या रखवालदारानेच ‘घोटाळा’ करण्यासारखंच असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी पक्षाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र विदर्भाची भूमिका म्हणजे आईपासून मुलास तोडण्यासारखं असल्याचंही या अग्रलेखात म्हटले आहे.

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरमधील दौर्‍यादरम्यान विदर्भ योग्य वेळी स्वतंत्र होईल, असे म्हटले होते. मात्र शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी नागपूरात बोलताना स्वतंत्र विदर्भाचा विषय टाळला असता तर बरं झालं असतं, असं या अग्रलेखात म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस हे अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. त्यांनी विदर्भाच्या विकासाविषयी बोलायला हवं होतं.त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी अशी भूमिका मांडणं हे अखंड महाराष्ट्राच्या केशरी दुधात मिठाचा खडा टाकण्यासारखं असल्याचंही सामनतील अग्रलेखात म्हटलं आहे.

विदर्भात भाजपला कौल मिळाला हे मान्य पण हा कौल महाराष्ट्र तोडण्यासाठी आहे असा गैर समज कुणी करून घेऊ नये. त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी सर्व उद्योगपतींना विदर्भात नेवून विकासासाठी प्रयत्न करावेत. अखंड महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्कारलेल्या 105 वीरांचे स्वप्न साकार व्हावे यासाठीच नव्या मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close