विधानसभा अधिवेशन वाढवण्याची विरोधकांची मागणी

June 16, 2009 7:28 AM0 commentsViews: 7

16 जून राम प्रधान समितीवर अभ्यास करण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. राम प्रधान समितीच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी विरोधकांना एक दिवसाचा अवधीही हवा असल्याचा प्रस्ताव विरोधकांनी सभागृहात मांडला. मंगळवारी अधिवेशनचा शेवटचा दिवस होता. रामप्रधान समितीचा ऍक्शन टेकन रिपोर्टही सभागृहात ठेवण्यात आला. मात्र रामप्रधान समितीचा पूर्ण अहवाल सभागृहासमोर ठेवावा तसंच फक्त ऍक्शन टेकन रिपोर्ट ऐवजी पूर्ण अहवालावर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली. पण फक्त ऍक्शन टेकन रिपोर्ट विधानसभेत सादर करू आणि महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करू अशी भूमिका जयंत पाटील यांनी त्यावेळी घेतली. यावर आक्षेप घेत विरोधकांनी गोंधळ घातला. तसंच पूर्ण अहवाल विधानसभेत सादर करा आणि त्यावर चर्चा करण्याकरता एका दिवसासाठी अधिवेशन वाढवा या मागणीवर विरोधक ठाम राहिले. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला. या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. खरंतर सोमवारी सकाळी रामप्रधान समितीचा अहवाल सभागृहात मांडला जाणार होता. पण तो सोमवारी मांडला गेला नव्हता. त्यामुळेही विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यावेळी सरकार या अहवालावर चर्चा करायला टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. दरम्यान प्रधान समितीच्या रिपोर्टचा अधिवेशनाच्या कामकाज पत्रिकेत समावेश नसल्याचं आढळून आलं आहे.

close