क्रिकेटचा देव पुस्तकरूपात भेटीला !

November 5, 2014 10:46 PM1 commentViews:

The Sachin Story05 नोव्हेंबर : क्रिकेट ज्यांचा धर्म सचिन त्यांचा देव…या देवाने जरी क्रिकेटला अलविदा केला असला तरी सचिनची मैदानावरची दोन दशकांची इनिंग आता पुस्तकरुपातून चाहत्यांच्या भेटीला आली आहेत. सचिन तेंडुलकरच्या ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचररित्राचं दिमाखात प्रकाशन झालं. मुंबईत ‘ग्रँड मराठा या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा ग्रँड सोहळा झाला पार पडला. माजी क्रिकेटर सुनील गावस्कर, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर, वासू परांजपे त्याचबरोबर राहुल द्रविड, व्ही.व्ही. एस. लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांनी उपस्थिती लावून सोहळ्याला चार चाँद लावले. सचिनने हे आत्मचरित्र गुरू रमाकांत आचरेकर यांना अर्पण केलंय. तर या आत्मचरित्राची पहिली प्रत सचिनने आपल्या आईला दिली.

गेल्या 41 वर्षांचा आपल्या आयुष्याचा प्रवास सचिननं या पुस्तकातून जगाच्या समोर मांडलाय. ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्रातून सचिननं 24 वर्षांतील आपले अविस्मरणीय अनुभव शेअर केले आहेत. या आत्मचरित्रात असेही काही प्रसंग सचिननं लिहीलेत ज्यावरुन खळबळ उडाली आहे. चरित्र लिहित असताना ते प्रामाणिकपणानंच लिहिलं पाहिजे. मी माझी खेळाची कारकिर्दही अशीच प्रामाणिकपणे खेळलोय असं सचिननं म्हटलंय. सचिनच्या आयुष्यातील आत्तापर्यंत न सांगितलेल्या आणि न बाहेर आलेल्या अनेक गोष्टी या पुस्तकात आहेत. या सोहळ्याला रंगत आली टीम फॅब 4 मुळे…राहुल द्रविड, व्ही व्ही एस लक्ष्मण, सौरव गांगुली आणि सचिन एकाच व्यासपीठावर आले आणि त्यांनी जुन्या आठवणींना वाट मोकळी करून दिली.

राहुल द्रविड म्हणतो, आम्ही देशभरात फिरलो, भारतीय टीममध्ये अनेक जण वेगवेगळ्या प्रांतातून आले आहेत त्यामुळे सगळ्यांची भाषा वेगळी आहे. पण आम्हाला भाषेची कधी अडचण झाली नाही. मी आणि सचिन नेहमी मराठीमधूनच बोलायचो.

व्ही.व्ही. एस.लक्ष्मण म्हणतो, “मी या सर्वांत ज्युनिअर आहे. मी, सचिनला पहिल्यांदा 1996 ला इंग्लंड टूरवर भेटलो. इतका सिनिअर खेळाडू असूनही सचिनने मला खूप सांभाळून घेतलं. मला समजून घेतलं. त्याचवेळी सचिन किती मोठा क्रिकेटपटू आहे. याची प्रचिती आली.

सचिन तेंडुलकर - “मी आणि सौरव 1984 पासून एकत्र खेळतोयआणि आम्ही तेव्हापासूनचे मित्र आहोत.अंडर 15 च्या कॅम्पमध्ये आम्ही दोघांनी खूप धमाल केलीय.”

सौरव गांगुली – सचिन आणि मी अंडर 15 टीममध्ये एकत्र खेळलोय. मी खूप काही गोष्टी सचिनकडून शिकलोय. राहुल द्रविड आम्ही एकाच टीममध्ये होतो आमच्या फॅब 4 बरोबर विरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, अनिल कुंबळे असं दिग्गज ही होते हे आमचं भाग्य होतं.

आत्मचरित्राबद्दल सचिन म्हणतो,
“जेव्हा मी, हे पुस्तक लिहायला सुरुवात केली तेव्हा मला माहीत नव्हतं की, हे करायला मला किती वेळ लागेल. मला तब्बल 3 वर्षं लागली आणि बोरिया मुजुमदारनं मला जशा हव्या नेमक्या त्या भावना पुस्तकरूपात लिहिल्यात. त्या आठवणींना उजाळा देणं ही खूप सुंदर गोष्ट होती. गेल्या 41 वर्षांत मी, जे काही अनुभवलंय ते मला जगाबरोबर शेअर करायचं होतं. माझं आयुष्य कसं होतं ते सांगायचं होतं. ज्या गोष्टी घडल्या त्यातील एकही गोष्ट मला बदलावीशी वाटत नाही. माझ्या करिअरमध्ये अनेक चढउतार आले. माझ्या आयुष्यात नेमकं काय घडलं हे लोकांना कळावं हाच माझा उद्देश होता. जगभरातील तमाम फॅन्स, जे या सगळ्या प्रसंगात माझ्यासोबत होते त्यांना मी, हे पुस्तक अर्पण करतो. हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. खरं तर ही माझ्या आयुष्यातील सेकंड इनिंग आहे. मला आशा आहे की तुम्हाला ती आवडेल.”

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • anil gulekar

    सचिन आमचा खास चाहता हाये ………. जर त्याने आपले आत्मचरित्र मराठी मधून काढले असते तर बर जाले असते . मग सचिन मराठी असून फायदा काय ?

close