काँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग, आज होणार गटनेत्याची निवड

November 6, 2014 10:06 AM0 commentsViews:

maharashtra-assembly congress

06 नोव्हेंबर :  लोकसभा निवडणुकीच्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचा राज्यात दारुण पराभव झाला. काँग्रेसची सत्ता तर गेलीच पण विरोधी पक्षनेतेपदही शिवसेनेच्या भूमिकेवर अवलंबून आहे. विधानसभा निवडणुकीत तोंडावर आपटल्यानंतर प्रदेश काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्यावर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी ठाम असून, त्यादृष्टीने त्यांनी नवी दिल्लीमध्ये बुधवारी प्राथमिक बैठक घेतली. यावेळी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे द्यावे आणि विधानसभेतील गटनेतेपदाची जबाबदारी कोणावर सोपवावी, यावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गटनेता करू नये अशी जोरदार मागणी बहुतेक आमदारांकडून होत आहे. एवढंच नाही तर पराभवासाठी पृथ्वीराज चव्हाणच जबाबदार आहेत त्यामुळे त्यांना गटनेता करू नये, अशी मागणी माजी कॅबिनेटमंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी केली आहे. सत्तार हे अशोक चव्हाण गटाचे खंदे समर्थक मानले जातात. त्यामुळे गटनेता निवडणुकीआधीच गटातटाचं राजकारण उफाळून येताना दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गटनेतेपदाच्या शर्यतीत पृथ्वीराज चव्हाणांसोबत पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांची नावं आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेतील गटनेतेपद मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

दरम्यान, शिवसेनेने भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यास विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पदावर अनुभवी व्यक्ती बसविण्याचा पक्षनेतृत्त्वाचा विचार असल्याचे समजते. काँग्रेस पक्षाकडून अधिकृतपणे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close