भाजपला पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीत संभ्रम, निर्णय मात्र गुलदस्त्यात

November 7, 2014 9:55 PM0 commentsViews:

pawar on modi07 नोव्हेंबर : विधानसभेत झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. पण राष्ट्रवादी आता आपल्याच निर्णयामुळे संभ्रम अवस्थतेत सापडली आहे. भाजपला जर पाठिंबा दिला तर जनमानसात चुकीचा निर्णय जाईल अशी धास्ती राष्ट्रवादीला लागली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत यावर चर्चा झाल्याचं कळतंय.

गेली 15 वर्ष सत्ता उपभोगणार्‍या राष्ट्रवादीला अखेर जनतेनं विधानसभा निवडणुकीत नाकारलं. पण राष्ट्रवादीने सत्तेत कसं राहता येईल यासाठी धडपड सुरू केली. निकालाच्या दिवशीच राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. महाराष्ट्राच्या विकासासाठी स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यावेळी स्पष्ट केलं. त्यानंतर खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा देणार पण विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादीचे सर्व आमदार गैरहजर राहितील अशी वेगळी भूमिका मांडली. राष्ट्रवादीच्या या खेळीमुळे भाजप आणि शिवसेना गोत्यात सापडले. शिवसेनेनं भाजपला पाठिंबा देण्याचं ठरवलंय. पण अजूनही सेनेचा निर्णय झाला नाही. भाजपनेही सेनेला सोबत घेण्याची पूर्ण तयारी केलीय.

आता विश्वासदर्शक ठराव सादर करण्याची वेळजवळ आली असता राष्ट्रवादीने पुन्हा एकदा चाचपणी सुरू केलीय. आज शरद पवार यांनी वरिष्ठ नेते छगन भुजबळ, जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्या चर्चा केली. जर भाजपला पाठिंबा दिला आणि विश्वादर्शक ठरावाच्या वेळी आपले आमदार गैरहजर राहिले तर ते पक्षासाठी चांगलं ठरेल त्यामुळे जनमानासात योग्य तो संदेशही जाईल. पण राष्ट्रवादीचे आमदार जर हजर राहिले तर पक्षाचीच नाचक्की होईल अशी भीती या बैठकीत व्यक्त करण्यात आली. मात्र, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार गैरहजर राहतील की नाही याबद्दल निर्णय मात्र होऊ शकला नाही. राष्ट्रवादीने पाठिंबा दिला खरा पण आपल्याच निर्णयामुळे राष्ट्रवादी संभ्रमात सापडली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close