फार्महाऊस बांधण्यासाठी अजित पवारांनी रोखलं मुळा नदीचं पात्र

June 17, 2009 12:05 PM0 commentsViews: 5

17जून, पुणे जलसंपदा मंत्री अजित पवार यांनीच मुळा नदीचं पात्र अडवून फार्महाऊसचं बांधकाम सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या घोटवडे जमिनीच्या व्यवहार प्रकरणाचा 'आयबीएन-लोकमत'ची टीम पाठपुराव घेत होती. त्यावेळी मुळा नदीचं पात्र अडवून फार्महाऊसचं बांधकाम बांधकाम होत असल्याचं दिसून आलं. आयबीएन-लोकमतची टीम घोटवडे गावात पोहोचली तेव्हा बांधकाम काळ्या कापडाने झाकण्याचा प्रकार फार्म हाऊसमधील सुरक्षा रक्षकांनी केला. प्रत्यक्षात जमिनीचं प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मुळा नदीतून बेसुमार वाळू उपसा करून बांधकाम चालू असल्याचंही आयबीएन-लोकमतच्या टीमला आढळून आलं आहे. गावकर्‍यांवर दंडेली आणि दहशत माजवून हा प्रकार होत असल्याचंही समोर आलं आहे. मुळा नदीवर बांध घालून, शेतकर्‍यांचं हक्काचं पाणी तोडण्याचाही निर्दयी प्रकार घोटवडे गावात चालला असल्याचं गावकर्‍यांनी 'आयबीएन-लोकमत'ला सांगितलं. पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या जमीन व्यवहारप्रकरणी अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी कोर्टाचा अवमान केल्यामुळे कोर्टाने त्यांना आणि त्यांच्या फायर पॉवर ऍग्रो या कंपनीला समन्स बजावले आहेत. चंद्रकांत गुंडगळ हे सुनेत्रा पवार यांच्या फायर पॉवर ऍग्रो या कंपनीने विकत घेतलेल्या 10 एकर जमीनचे मूळ मालक आहेत.चंद्रकांत गुंडगळ यांच्याकडून ही जमीन रघुनाथ तापकीर यांनी विकत घेतली होती. पण ही जागा खोटं खरेदी खत करून ताब्यात घेतल्याचा दावा गुंडगळ यांनी केला आहे. याविषयीचा दावा कोर्टात सुरू असताना जागेविषयी कोणताही व्यवहार करू नये, असे आदेश कोर्टाने दिले होते. पण या प्रकरणाचा निकाल लागण्यापूर्वीच पॉवर ऑफ ऍटर्नी करून तापकीर यांच्याकडून ती जमीन विकत घेण्यात आली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 जुलैला आहे.

close