शिवसेना लढवणार विधानसभा अध्यक्षपदाची निवढणूक

November 10, 2014 1:40 PM0 commentsViews:

BJP Shivsena

10  नोव्हेंबर :  विधानसभा निवडणुकीनंतरही शिवसेना आणि भाजप यांच्यात सूत जुळण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याची तयारी केली असून,  त्याचाच एक भाग म्हणून विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना उमेदवार देणार असल्याची माहिती पक्षाच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी दिली आहे. त्याच बरोबर भाजपसोबत शिवसेनेची चर्चा थांबली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मात्र शिवसेनेसोबत अजूनही चर्चा सुरू आहे आणि लवकरच त्यातून चांगला निष्कर्ष निघेल, असं व भाजप नेते राजीव प्रताप रुडींनी सांगितलंय.

विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाचा उमेदवाराला विधानसभेचे अध्यक्षपद दिले जाते. मात्र, सद्यस्थितीत विधानसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. 122 सदस्यांसह भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात शिवसेना अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभेत शिवसेनेचे 63 आमदार निवडूण आले आहेत.

विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सोमवारी सकाळी सुरुवात झाली. सोमवारी विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली जात आहे. यासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून् जीवा पांडू गावित यांची निवड करण्यात आली आहे. विधानसभेमध्ये पहिल्या दिवशी शिवसेनेच्या सदस्यांनी विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्षच नसल्यानं आज विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्य विरोधी पक्षाच्या बाकावर कोण बसणार, असा पेच आज निर्माण झाला होता. अखेर शिवसेना हा दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असल्याने त्यांनाच मुख्य विरोधी पक्षाच्या आसनव्यवस्थेवर बसवण्यात आलं. विरोधी पक्षाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मुख्य विरोधी पक्षाच्या जागेवर शिवसेनेची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या 63 आमदारांकडून ठसा उमटवणारं काम होईल असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलं पण सत्तेत सामील होण्याबद्दल शिवसेनेची काय भूमिका आहे हे अजूनही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close