भाजपसोबत जुळलं तर जुळलं, सेनेचं तळ्यात-मळ्यात सुरूच

November 10, 2014 6:48 PM0 commentsViews:

uddhav_in_ekvira10 नोव्हेंबर :‘भाजपने जर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर आम्ही विरोधी बाकावर बसू’ अशी भूमिका स्पष्ट केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता आणखी संभ्रम वाढवला आहे. विरोधी पक्षनेता आमचाच होईल पण भाजपसोबत चर्चा करायला अजूनही तयार आहे. भाजपसोबत चर्चा सुरूच ठेवणार, जुळलं तर जुळलं असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय. सहनशीलता म्हणजे लाचारी नाही असंही उद्धव म्हणाले. त्यामुळे शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही याबाबत पुन्हा चर्चेचं दार उद्धव यांनी उघड ठेवलं आहे.

भाजपला सत्तेसाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. शिवसेनेनं कालच आपली भूमिका जाहीर केली. आणि आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. त्यानंतर शिवसेनेनं विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा केला आहे. सेनेनं तसं पत्र विधानसभा सचिवांकडे दिलंय. तसंच विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेकडून गटनेते एकनाथ शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला आहे अशी माहिती शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांनी दिली. आता सेना विरोधी बाकावर बसणार हे स्पष्ट झालंय. पण मुंबईतील रंगशारदा हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी गुगली टाकलीये. आज आपण विरोधी पक्षनेतेपदी दावा केला आहे. मी शेवटच्या क्षणापर्यंत थांबलो आहे. भाजपचे नेते प्रताप रुड्डी म्हणता सेनेसोबत चर्चा सुरू आहे. मग चालू द्या चर्चा तुमच्या रुढी, परंपरा लागू करा आणि दुसर्‍या बाजूला चर्चा सुरू ठेवा. आता कुणाचा कुणावर विश्वास राहिलेला नाही.
आम्ही विरोधीपक्षनेतेपदावर दावा यासाठीच केला की, काँग्रेसने आपलं घोडं पुढे केलंय. जर काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आणि आम्ही नुसतं दळत बसलो तर ‘ना घर का ना घाट का’ अशी अवस्था होऊन जाईल. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर हक्क सांगितला आहे आणि आमचाच विरोधी पक्षनेता होईल. तुमच्याशी चर्चा करायला आम्ही कधीही तयार आहोत. जुळलं तर जुळलं नाहीतर विरोधी पक्षाची भूमिका प्राणपणाने निभवणार असं उद्धव यांनी म्हटलंय. तसंच मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आपण भगवा आतंकवाद हा शब्दप्रयोग केला होता. जेव्हा मातोश्रीवर गेलो होतो तेव्हा त्यांना भगवा आतंकवाद सुचला नाही का असा टोला शरद पवारांनी लगावला होता. पवारांच्या या विधानाचा उद्धव यांनी समाचार घेतला. तुम्ही घरी आलता हे खरं आहे पण आम्ही तुम्हाला न पाहता प्रणव मुखर्जी यांना पाहून पाठिंबा दिला होता असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close