शिवसेना, पवार आणि राजका’रण’ !

November 10, 2014 9:09 PM0 commentsViews:

sharad pawar and bal thackeray ‘राष्ट्रवादी आमचा कट्टर शत्रू’ असं मानणारी शिवसेना मात्र राजकारणाच्या पलीकडे शरद पवार यांना मित्रही मानते हे जाहीर आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी शरद पवारांना नावाने न हाक मारता ‘शरद बाबू’ म्हणायचे. एवढंच नाहीतर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पाठिंब्यासाठी शरद पवार ‘मातोश्री’वर गेले होते. सत्तेच्या पटलावर ठाकरे विरुद्ध पवार असं युद्ध जरी रंगलं पण या नात्याला मैत्रीची झालर सुद्धा आहे. याचीच प्रचिती सध्या घडणार्‍या घडमोडींवरून दिसून येत आहे.

भाजप आणि सेनेचा 25 वर्षांचा संसार मोडला आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादीनेही आघाडी तोडली. भाजपने 122 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला पण बहुमताने हुलकावणी दिली. त्यामुळे युती तुटली खरी पण सेनेचा सरळ पाठिंबा कसा घ्यावा असा पेच निर्माण झाला. निकालाच्या दिवशीच राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही, त्यापेक्षा सेनेला सोबत घेऊ अशी विधानं भाजपच्या नेत्यांनी केली. नुसते नेतेच नाहीतर भाजपच्या वरिष्ठांनीही हीच भूमिका घेतली. आता तर भाजपनं राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर शिवसेना विरोधी पक्षांत बसेल अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तर पवारांनी सरकार अस्थिर होऊ देणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करत आपली वेगळी भूमिका मांडलीये. सत्तेचा मार्ग कसाही असला तरी आता दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपला चांगलेच अडचणीत आणले आहे. त्यामुळेच शिवसेनेनं वेळोवेळी शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाविषयी सोयीस्कर भूमिका घेतल्यात. कधी कृतीतून तर कधी बोलण्यातून ते दिसून आलंय. एक नजर टाकूया या दोन पक्षांच्या संबंधांवर…

- कितीही आरोप आणि बोचरी टीका केली तरी शिवसेना प्रमुखांसाठी पवार नेहमीच शरद बाबू म्हणून जवळचेच राहिले
- शरद पवार पंतप्रधान होत असतील तर शिवसेना पाठिंबा देईल अशी भूमिका घेतली गेली होती
- लोकसभा निवडणुकीवेळी बारामतीचा मतदारसंघ शिवसेनेनं ऐनवेळी महादेव जानकर यांना सोडला
- विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचं जाहीर कौतुक केलं होतं
- विधानसभेच्या निकालानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षांनी एकत्र येवून सरकार बनवावं आणि त्याला काँग्रेस बाहेरून पाठिंबा देईल, असा प्रस्ताव एका काँग्रेस नेत्यानं दिल्याचा गौप्यस्फोट केला
- अर्थातच काँग्रेसनं पवारांचं म्हणणं नाकारलं
- अगदी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते दोनदा आपल्याला भेटले पण कोणताही प्रस्ताव दिला नाही असा आणखी एक गौप्यस्फोट शरद पवारांनी केला होता
- प्रतिभाताई पाटील यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी शरद पवार मातोश्रीवर गेले होते.
- पुन्हा प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी शरद पवार पुन्हा मातोश्रीवर गेले. दोन्ही वेळच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादी आणि यूपीएला पाठिंबा दिला होता.
- बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आली.

अशा एक ना अनेक उदाहरणांवरुन शिवसेनेचे शरद पवारांबरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध स्पष्ट होतात यावरुन राजकारणात ना कोणी कोणाचा कायमस्वरुप शत्रू नाही ना कोणी कोणाचा मित्र नाही या उक्तीचीच प्रचिती राजकारणात वेळोवेळी येतय हेच खरं…
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close