प. बंगालमध्ये तणावाचं वातावरण कायम

June 18, 2009 3:17 PM0 commentsViews: 1

18 जून गेल्या पाच दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये माओवादी आणि सीपीएमचे कार्यकर्ते यांच्यात चाललेल्या चकमकींमुळे तणावाचं वातावरण अजूनही कायम आहे. माओवाद्यांना रोखण्यासाठी पं. बंगाल सरकारने कठोर पावलं उचलायला सुरुवात केली. प. बंगाल पोलिसांनी लालगडसह काही भागातून माओवाद्यांना हुसकवून लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या पाच दिवसांपासूनच्या माओवादी आणि आदिवासींच्या कारवायांनी पोलीस संतापले आहेत. प. बंगाल सरकारने केंद्रीय पोलीस दलाची मदत घेतली आहे. केंद्रीय राखीव दलाच्या पाच तुकड्या आणि नक्षलवादविरोधी कंमाडो पथकाच्या चार तुकड्या घटना स्थळी पोहोचल्या आहेत. दरम्यान पोलिसांना रोखण्यासाठी आदिवासींनी लालगडमध्ये माणसांचे तीन कडे केल्याचं समजतंय. हल्ला रोखण्यासाठी त्यांनी लहान मुलं आणि महिल्यांना पहिल्या कड्यात तैनात केलं आहे. माओवाद्यांनी रस्ते उखडलेत. तसंच झाडंही तोडून रस्त्यावर टाकली आहेत. रस्त्यांमध्ये लँडमाईनही पेरलं गेल्याची शक्यता आहे, असं एका पोलीस अधिकार्‍याने म्हटलं आहे. सीपीएमने राज्यव्यापी बंद पुकारला होता. संशयित नक्षलवाद्यांनी पश्चिम मिदनापूरमधल्या बक्सोल भागात झालेल्या चकमकीत सीपीएमच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या केली. त्यावरून या भागात वातावरण तंग झालं होतं. गेल्या पाच दिवसांत माओवाद्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी सीपीएमच्या कार्यकर्त्यांना जेरीस आणलं. त्यांच्या हल्ल्यात सीपीएमचे 10 कार्यकर्ते ठार झाले आहेत. लालगड हा सीपीएमचा बालेकिल्ला समजला जातो. प. बंगाल सरकारच्या म्हणण्यानुसार बहुतेक माओवादी शेजारच्या झारखंडमधून आलेले आहेत.

close