लँडमाफिया दीपक मानकर काँग्रेस पक्षातून निलंबित

June 18, 2009 3:22 PM0 commentsViews: 7

18 जून पुण्यातील नातू कुटुंबीयांची जमीन बळकावल्याप्रकरणी दीपक मानकर यांच्यावर काँग्रेसने गुरुवारी निलंबनाची कारवाई केली आहे. दीपक मानकर हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. नातू कुटुंबीयांना दीपक मानकरनं जमिनीसाठी धमक्या दिल्या होत्या. पण पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारताच दीपक मानकर फरार झाले आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीनही कोर्टाने फेटाळला आहे. या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार होती. शुक्रवार पेठेतील वाड्याची जागा दीपक मानकर यांनी धमकी देऊन घेतल्याची तक्रार यशवंत नातू यांनी पुण्याच्या खडकी पोलीस ठाण्यात केली होती. मीडियाने हे प्रकरण उचलल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी बिल्डर सुधीर कर्नाटकी, काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यासह अकरा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्या अकराही जणांना लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे. आम्ही या संदर्भात सर्व रेकॉर्डस् तपासत आहोत. चार पथके तपासासाठी रवाना करण्यात आली आहे. लवकरच आरोपींना अटक करू, असं आश्वासन पुण्याचे पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांनी दिली आहे.या संपूर्ण प्रकरणात तक्रारकर्ते यशवंत नातू यांना दीपक मानकर यांनी काँग्रेस भवनात नेऊन धमकावल्याचा आरोप नातू कुटुंबियांनी केल्यामुळे खळबळ उडाली. यावर ' काँग्रेस भवनात अशा गोष्टींना थारा देण्यात येत नाही. हे आरोप सिद्ध झाले तर कारवाई करण्यात नक्कीच यश येईल, असं काँग्रेसचे शहर अध्यक्ष अक्षय छाजेड यांनी म्हटलंय. दीपक मानकरसह बिल्डर कर्नाटकी आणि माजी नगरसेवक दत्ता सागरे यांनीही अटकपूर्व जामिनासाठी पुणे सेशन कोर्टात अर्ज केला आहे. मात्र, आता दीपक मानकर यांना अटक होणार का आणि त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येईल काय याची उत्सुकता पुणेकरांना लागली आहे. कारण पुण्यातल्या बाणेर इथल्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाणेरच्या जागेवरून अशोक गुप्ता आणि दीपक मानकर यांच्यात वादही सुरू होते. काँग्रेसने ही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली तरी त्याला इतका उशीर का लागला, मानकरसारख्या गुंडाला एवढा राजकीय पाठिंबा कोणामुळे मिळाला, त्यांचा राजकीय गॉडफादर कोण, त्यांना पाठीशी कोण घालतंय, या प्रश्नांची उत्तर कधी मिळतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

close