…अशी झाली भाजपची ‘परीक्षा’ !

November 12, 2014 10:43 PM0 commentsViews:

12 नोव्हेंबर : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाची महत्त्वाची परीक्षा पास केली. पण त्यापूर्वी बर्‍याच नाट्यमय घटना घडल्या. गेल्या कित्येक वर्षांत महाराष्ट्राच्या विधिमंडळात इतक्या वेगवान घडामोडी घडल्या नव्हत्या, त्या आज बघायला मिळाल्या. याचसंदर्भातला हा एक रिपोर्ट…

सकाळी विधानभवन परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येताच पत्रकारांनी त्यांना गराडा घातला. त्यांनी मीडियाशी बोलणं टाळलं. राष्ट्रवादीचा पाठिंबा असला, तरी शिवसेनेशी शेवटच्या क्षणापर्यंत बोलणी सुरू होती. सरकारचे मंत्रीही आता नेमकं काय होणार याबद्दल स्पष्ट बोलत नव्हते. अध्यक्षपदी भाजपच्या हरिभाऊ बागडेंची बिनविरोध निवड झाल्यानंतर सस्पेंस वाढला. आत भलतंच नाट्य घडणार होतं

नेमकं काय घडलं सभागृहात?
– 12 वाजून 38 मिनिटांनी भाजप आमदार आशिष शेलारांनी विश्वासदर्शक ठराव मांडला
– ठराव मांडताच सभागृह अध्यक्ष बागडेंनी आवाजी मतदान घेतलं
– यानंतर गदारोळ झाला, त्यातच ठराव मंजूर झाल्याची घोषणा अध्यक्षांनी केली
– यावर शिवसेनेनं आक्षेप घेत मतविभाजनाची मागणी केली
– अध्यक्षांनी ही मागणी फेटाळली
– अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याची घोषणाही करून टाकली
– त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला
– शिवसेना आमदारांनी अध्यक्षांच्या वेलमध्ये येत अभूतपूर्व गदारोळ केला

यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झालीय. शिवसेनेची पुन्हा मतदान घेऊन बहुमत सिद्ध करण्याची मागणी कायम आहे. तर विधानसभेत लोकशाहीची हत्या झाली, असं म्हणत काँग्रेसने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला. ते राज्यपालांकडे तक्रार करणार आहेत.
पण मतविभागणीची मागणी करायला काँग्रेसने उशीर केला, असा तांत्रिक मुद्दा मांडत विधानसभा अध्यक्ष आणि सरकारने विरोधकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दिल्या. विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे आलंय तर काँग्रेस विरोधी बाकावर बसलीय. पण राष्ट्रवादीचं काय ? आवाजी मतदानात राष्ट्रवादीचं मत गुलदस्त्यातच राहिलं. देवेंद्र फडणवीस सरकारने बहुमत मिळवलं असलं, तरी ते वादग्रस्त ठरलंय. कामकाजाला लागण्याआधी मुख्यमंत्र्यांना हे संशयाचं वातावरण दूर करावं लागणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close