अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी स्वीकारली भाजपच्या पराभवाची जबाबदारी

June 20, 2009 11:26 AM0 commentsViews: 4

20 जूनलोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची जबाबदारी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी दिल्लीतल्या भाजपच्या आत्मचिंतन बैठकीत स्वीकारली आहे. निवडणुकीतल्या पराभवानंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या दोन दिवसांच्या बैठकीला नवी दिल्लीत शनिवारपासून सुरुवात झाली आहे. त्यावेळी कोणत्याही गोष्टीच्या पराभवात आणि विजयात प्रत्येक व्यक्तीचा वाटा असतो असंही राजनाथ सिंग म्हणाले. भाजपच्या या आत्मचिंतन बैठकीला ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाची चर्चा करण्यात आली. त्यानंतर भाजपचे प्रवक्ते रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील चर्चेची माहिती दिली. रविवारी बैठकीचा दुसरा दिवस आहे.हिंदुत्वाचा मुद्दा भाजप सोडणार नसल्याचंही आत्मचिंतन बैठकीत पक्षाने स्पष्ट केलं आहे. भाजपने मध्यममार्गी बनावं असा सल्ला दिला जातोय पण भारताच्या इतिहासात उजव्या विचारसरणीचाच प्रभाव राहिला आहे, असं राजनाथ सिंग यांचं म्हणणं आहे. त्यामुळे भाजप हिंदुत्वाचा उजवा मार्ग सोडणार नाही असंही त्यांनी म्हटलं. देशहितासाठी सरकारला पाठिंबा देणार असल्याचंही बैठकीत भाजपने मान्य केलं आहे.लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर, भाजपमधला अंतर्गत संघर्ष वाढत आहे. जसवंत सिंग, यशवंत सिन्हा यांच्यानंतर आता अरुण शौरी यांनीही पक्षाविरोधात मत व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ नेते अरुण शौैरी यांनी राजनाथ सिंग यांना पत्र पाठवून पक्षाविरोधात मत व्यक्त केलं होतं. त्या पत्रात अरुण शौरी यांनी पक्षातल्या निर्णय प्रक्रियेवर टीका केली होती. शौरी यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्यावर मर्जीतल्या लोकांना झुकतं माप देत असल्याचा आरोपही पत्रातून केला होता. त्यामुळे भाजपपुढचं सर्वात मोठं आव्हान राष्ट्रीय अजेंडा ठरवण्याचं नाही तर पक्षाची ढासळती स्थिती सावरण्याचं आहे, हे दिसून आलं आहे. परिणामी शनिवारच्या बैठकीवरही पक्षातल्या अंतर्गत संघर्षाचं सावट असणार अशी चिन्हं दिसत आहेत.

close