आवर्जून पाहावा ‘एलिझाबेथ एकादशी’

November 14, 2014 8:40 PM1 commentViews:

अमोल परचुरे, समीक्षक

सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, या माध्यमावर हुकूमत चालते ती दिग्दर्शकाची…दिग्दर्शकाचे विचार ठाम असतील, मार्ग नीट आखलेला असेल तर तुम्हाला उत्तमच सिनेमा बघायला मिळतो…’फँड्री’, ‘रेगे’ आणि आता एलिझाबेथ एकादशी बघताना पुन्हा त्याचा प्रत्यय आलाय. ‘हरीश्चंद्राची फॅक्टरी’नंतर परेश मोकाशीने आणखी एक मास्टरपीस सादर केलेला आहे. परेश आणि मधुगंधाच्या प्रॉडक्शनचं नावही किती समर्पक आहे, मयसभा…सत्याचा आभास निर्माण करुन प्रेक्षकांना गुंगवून टाकण्याची किमया परेशने साधलेली आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा केवळ नव्वद मिनिटांचा सिनेमा आहे, म्हणजेच कथेचा जेवढा जीव आहे. तेवढाच सिनेमा बनवण्याचंही भानही परेशला पुरेपूर आहे. उगाच फाफटपसारा न करता, प्रेक्षकांना आवडतं या नावाखाली अनावश्यक गोष्टींचा भरणा न करता अतिशय सुंदर, निर्मळ, निरागस, हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कलाकृती…

काय आहे स्टोरी ?

elizabethज्ञानेश आणि झेंडू या भावंडांची ही गोष्ट आहे.विठ्ठलावर जशी वारकर्‍यांची भक्ती असते. अगदी तसंच प्रेम या ज्ञानेशचं आपल्या सायकलवर आहे. ही सायकल म्हणजेच एलिझाबेथ..ही सायकल त्याच्या वडिलांनी बनवली असल्यामुळे ज्ञानेशचं आणि या एलिझाबेथचं एक निरागस नातं तयार झालंय. या एलिझाबेथला जीवापाड जपणार्‍या ज्ञानेशला शेजार-पाजारची लोकं थट्टा करतायत, याचंही फारसं वाटत नाही. सिनेमाच्या कथेबद्दल यापेक्षा जास्त सांगत नाही, कारण ही कथा अनुभवणं हाच एक सोहळा आहे. प्रेक्षक म्हणून आपली एक सवय असते, पुढे काय घडणार याचा अंदाज बांधत राहणं आणि मग अंदाज खरा ठरला की स्वत:वरच खुश होणं हा सर्वसामान्य प्रेक्षकाचा स्वभाव असतो. एलिझाबेथ एकादशीमध्ये मात्र अशा प्रेक्षकांचे अंदाज चुकत जातील आणि हीच त्या कथेतली, सिनेमातली गंमत आहे.

नवीन काय ?

Elizabeth-Ekadashi-घरावर आलेलं संकट दूर करण्यासाठी घरातल्या मुलांनी आपल्या मित्रांसोबत केलेली धडपड म्हणजे एलिझाबेथ एकादशी…गाडगेबाबांच्या विचारांचा आणि न्यूटनच्या विज्ञानाचा वारसा म्हणजेच एलिझाबेथ एकादशी…माणुसकी, चांगुलपणा या लोप पावत चाललेल्या गोष्टी जिथे जतन करुन ठेवलेल्या आहेत ती जागा म्हणजे एलिझाबेथ एकादशी…गाडगेबाबा, न्यूटन, अंधश्रध्दा निर्मूलनाचा लढा हे सगळं परेशने मुख्य कथेमध्ये अगदी बेमालूमपणे मिसळलंय. पंढरपूरात राहताना वारकर्‍यांसोबत ताल धरणारी ही मुलं न्यूटन, आईनस्टाईनच्या विश्वातही तेवढीच दंग होतात, अशा प्रसंगांमधून किती अर्थ काढता येतील याचा विचार सिनेमा संपल्यावर आपण करत राहतो.

मधुगंधा कुलकर्णीने लिहीलेली कथा साधी-सोपी आणि म्हणूनच मनाला भिडणारी आहे, त्यावर परेशने दिग्दर्शक म्हणून जो साज चढवलाय तो अप्रतिमच आहे.पंढरपुरात वावरणारी सामान्य माणसं येता जाता या मुलांशी बोलत असतात, प्रश्न विचारत असतात, निरोप देत असतात आणि हे सगळं कोणत्याही छोट्या गावात अगदी सहजपणे घडत असतं. या सहजपणात आपुलकी दडलेली असते, मनात कुठे कटुता नसते, असलीच तर काळजी, लोभ, माया हेच भाव असतात. हीच आपुलकी अगदी सहजपणे प्रत्येक दृश्यात परेशने सजवलेली आहे.

बघताना जे सहज आहे असं वाटतं तेच खूप आव्हानात्मक असतं आणि म्हणूनच परेश आणि टीमला सलाम करावासा वाटतो. अमोल गोळेचा कॅमेरा, नरेंद्र भिडे यांचं पार्श्वसंगीत या तसं म्हटलं तर तांत्रिक गोष्टी आहेत, पण त्यांचं तांत्रिकपण जाणवत नाही एवढं ते सिनेमाबरोबर मिसळून गेलंय. आपण दिलेलं संगीत पडद्यावर बघायला म्हणून नाही, पण आपलं संगीत ज्या अप्रतिमपणे पडद्यावर जिवंत झालंय ते पाहण्यासाठी आनंद मोडक यांनी अजून थोडं जगायला हवं होतं असाही एक विचार येऊन जातो. गाण्याचं आणि दृश्यांचं जे अदृश्य नातं असतं ते य ासिनेमात तुम्हाला बघायला मिळेल.

परफॉर्मन्स

elizabeth235एलिझाबेथ एकादशीचा कर्ता-धर्ता जरी दिग्दर्शक असला तरी या सिनेमाची जान आहे यातले सर्व कलाकार…खासकरुन बालकलाकार.. ज्ञानेशची भूमिका करणारा श्रीरंग महाजन याने यापूर्वी एकदोन सिनेमे केलेले आहेत, म्हणजे या माध्यमाची त्याला थोडीफार ओळख आहे, पण बाकी सगळे त्याचे साथीदार हे पंढरपुरातलेच आहेत, त्यांना या माध्यमाचा कसलाच अनुभव नाही. पण, हा फरक लक्षात येणार नाही एवढं सुंदर आणि नैसर्गिक काम या सर्वांनी केलंय.

पुष्कर, सायली, चैतन्य, दुर्गेश यांच्याबरोबर वावरताना श्रीरंगही पंढरपुरातलाच वाटायला लागतो. या मुलांकडून एवढं छान काम केलंय, त्यांच थोडं क्रेडिटही दिग्दर्शकाला द्यायला हवं. ज्ञानेशच्या आईची भूमिका केलीये नंदिता धुरीने.आता हे सगळं लिहीताना भूमिका केलीये, अभिनय केलाय असं म्हणावं लागतंय, पण खरंतर कुणीच अभिनय केला नाहीये असंच वाटत राहतं. आजीच्या भूमिकेतल्या वनमाला किणीकर असोत, शाळेतले शिक्षक असोत किंवा वारीच्या काळात ज्ञानेशच्या घरी येऊन राहणारे वारकरी असोत सर्वांना बघून आपल्या मनात आनंद साठून राहतो. कुठे काही चांगलं घडत असेल तर ती फँटसी समजण्याच्या सध्याच्या काळात एवढी प्रेमळ, समंजस, जीवाला जीव देणारी माणसं बघून नकळत डोळ्यात पाणी येतं आणि इथेच या एकादशीची कहाणी सुफळ संपूर्ण होते.

रेटिंग 100 पैकी 100

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ajay ghate

    रेटिंग १०० पैकी १००, पटले नाही बुवा !!
    ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ला त्यावेळी काही समीक्षकांनी चित्रपट नव्हे तर टेलीफ़िल्म अशी टिपण्णी दिली होती तशीच टिपण्णी एलिजाबेथ एकादशी बाबत ही वर्तवली जाईल अशी शक्यता आहे. एलिजाबेथ एकादशीची कथा दीड तासातच उरकल्याने घटनाक्रमाला वाव मिळाला नाही. कथेतील एकाच घटनेच्या निम्मित्ताने चित्रपट फिरू लागतो. त्या घटनेला विविध कंगोर्याची गरज होती. पटकथा थोड़ी फार विस्तारली असती तर प्रसंगाना आणखी रंगवता आले असते. बच्चेकंपनीच्या अभिनय सादरीकरनालाही वाव मिळाला असता. अभिनयाच्या बाबतीत ही मुले कुठेही कमी पडली नाही. त्यांचा पुरेपूर वापर करून घ्यायला हवा होता. विशेष् करून गण्या आणि झेंडू(मुक्ता). निदान झेंडूच्या वाट्याला तरी एखाद दोन अधिक प्रसंग यायला हवे होते. तसेच चित्रपटाला आणखी एक दोन गाण्याची गरज होती जेणेकरून चित्रपट फुलवायला मदत झाली असती. चित्रपटात एकच गाणे आहे तेही चित्रपटाच्या अखेरीस एंड स्क्रोल साठी वापरले गेले. परेश मोकाशी यांनीच शब्दबद्ध केलेले दगड-दगड असे बोल असलेले गाणे श्रवणीय आणि गमतिदार पद्धतीने सूंदरपणे चित्रीत केले आहे पण जेंव्हा ते चालु होतं तेंव्हा बरेचसे प्रेक्षक प्रेक्षागृहाच्या बाहेर पडलेले असतात. त्यामुळे आनंद मोडक यांनी जगाचा निरोप घेण्याअगोदर संगीतबद्ध केलेले हे गाणे प्रमोशन पुरतेच मर्यादित राहीले की काय असे वाटले. हा चित्रपट तांत्रिक बाजुत थोडा दुर्लक्षिला गेला. चित्रपटातले काही दृश्यांचि ऑडियो सिंक अत्यल्प प्रमाणात मागेपुढे होती. काही मॉब शॉटच्या डबिंगमध्ये दुर्लक्ष झाल्या सारखे जाणवत होते. असे असले तरी चित्रपटाची लिंक यामुळे कुठेही तूटत नाही.

    डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रिअल हिरो, मामाच्या गावाला जावु या, ध्यास या सारख्या चित्रपटाच्या भाउगर्दीत एलिजाबेथ एकादशी आपली स्वत:चे वेगळेपण सिद्ध करेल यात शंका नाही.

    – अजय

close