बाळासाहेबांचे कार्य आजही प्रेरणादायी- नरेंद्र मोदी

November 17, 2014 9:50 AM0 commentsViews:

1

17 नोव्हेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दुसरा स्मृतिदिन आहे. स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर दाखल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही बाळासाहेबांच्या दुसर्‍या स्मृतिदिनाबाबत ट्विटरवरून त्यांना आंदराजली वाहिली आहे. बाळासाहेबांचं आयुष्य आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहिल. संपूर्ण आयुष्य लोकांसाठी लढणार्‍या आणि कणखरपणे त्यांच्या पाठी उभे राहणार्‍या बाळासाहेब ठाकरेंना मी अभिवादन करतो, अशा भावना मोदींनी ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत.

तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. ‘शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट माननिय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


विधानसभा निवडणुकीपासून भाजपा आणि शिवसेनेमध्ये अनेक खटके उडाले. शिवसेनेने भाजपवर अत्यंत तिखट शब्दात हल्ला केला असून भाजपनेही शिवसेनेला चांगलेच तंगवून ठेवले. भाजपचे नेते बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन आदरांजली वाहणार का?, शिवसेना- भाजपचं पुन्हा मनोमिलन होणार का?, अशा अनेक चर्चांना सध्या उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट शिवसेना-भाजपामधील तणाव कमी करू शकते. मोदींच्या ट्विटनंतर भाजपाचे वरिष्ठ नेते शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close